- Hindi News
- वाघोलीत महिलेला जखमी करून मंगळसूत्र लांबवणारा चोरटा जेरबंद; चोरीच्या दुचाकीसह अवघ्या ८ तासांत पोलिसा...
वाघोलीत महिलेला जखमी करून मंगळसूत्र लांबवणारा चोरटा जेरबंद; चोरीच्या दुचाकीसह अवघ्या ८ तासांत पोलिसांची धडक कारवाई!
पुणे: पुण्यातील वाघोली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली असून, रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि तिला गाडीवरून पाडून जखमी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला वाघोली पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या बळावर अवघ्या ८ तासांत या आरोपीचा शोध घेत त्याला जेरबंद केले. योगेश शिवाजी जाधव (वय २० वर्षे, रा. कटकेवाडी, वाघोली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दि. २० मे २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला तिच्या पतीसोबत दुचाकीवरून पुणे-अहिल्यानगर रस्त्याने जात होती. ती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर आली असता, आरोपीने अचानक तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत मंगळसूत्र खाली पडले, मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दुचाकीचा समतोल बिघडला आणि फिर्यादी महिला गाडीवरून खाली कोसळून गंभीर जखमी झाली.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती नुतन पवार आणि वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेची भेट घेतली व तिची विचारपूस केली. पोलिसांनी महिलेकडून आरोपीचे हुबेहूब वर्णन जाणून घेतले आणि तपास पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले.
वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार पांडूरंग माने, साईनाथ रोकडे आणि प्रीतम वाघ यांनी आधुनिक तांत्रिक विश्लेषण आणि आपल्या खासगी सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या ८ तासांत आरोपी योगेश जाधव याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून, अधिक तपासात ही दुचाकी देखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस उपनिरीक्षक शहादेव हवाले या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. आरोपी योगेश जाधव याच्या अटकेमुळे वाघोली पोलीस स्टेशनमधील गु.र.नं. ३३५/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०९ (५), १२५ (ब)) आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमधील गु.र.नं. १८९/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३ (२)) असे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, परिमंडळ ७ चे पोलीस उप आयुक्त श्री. सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे आणि गहिनाथ बोयणे यांनी मिळून ही यशस्वी कारवाई केली आहे.
