- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- खळबळजनक: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची सून १० कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत
खळबळजनक: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची सून १० कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत
मुंबई: मुंबईतील एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कोट्यवधींची खंडणी मागणाऱ्या दोन महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक, हेमलता पाटकर, ही 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नोव्हेंबर महिन्यात अंधेरी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याची पार्टी सुरू होती. यावेळी लेझर लाईटच्या वापरावरून हेमलता पाटकर, तिची मैत्रीण अमरीना जव्हेरी आणि बिल्डरचा मुलगा यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर, २३ नोव्हेंबर रोजी या महिलांनी अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली.
१० कोटींची मागणी आणि पोलिसांचा सापळा
दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी या महिलांनी बिल्डरकडे तब्बल १० कोटी रुपयांची मागणी केली. अनेक चर्चेनंतर ही रक्कम ५.५ कोटी रुपयांवर निश्चित करण्यात आली. मात्र, महिलांच्या सततच्या दबावाला कंटाळून बिल्डरने मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधला.गुन्हे शाखेने तातडीने हालचाली करत लोअर परळ परिसरात सापळा रचला. २३ डिसेंबर रोजी खंडणीचा पहिला हप्ता म्हणून १.५ कोटी रुपये स्वीकारताना हेमलता पाटकर आणि अमरीना जव्हेरी यांना पोलिसांनी रंगेहात बेड्या ठोकल्या.
तपासात धक्कादायक खुलासे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमलता पाटकर (३९, रा. कांदिवली) आणि अमरीना जव्हेरी (३३, रा. सांताक्रूझ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. केवळ पैसे उकळण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करणे आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी या महिलांनी दिली होती. याप्रकरणी न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कुटुंबातील व्यक्ती अशा गंभीर गुन्ह्यात सापडल्याने संपूर्ण मनोरंजन सृष्टीत सध्या याच विषयाची चर्चा रंगली आहे.
