- Hindi News
- संस्कारांची शिदोरी आणि व्यसनमुक्तीचा जागर! नरवणे बालसंस्कार केंद्राचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात
संस्कारांची शिदोरी आणि व्यसनमुक्तीचा जागर! नरवणे बालसंस्कार केंद्राचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात
दहिवडी: महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या संकल्पनेतून २०११ साली सुरू झालेल्या नरवणे येथील बालसंस्कारोपासना केंद्राचा १४ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त सामाजिक प्रबोधन, स्वच्छता आणि संस्कारांची शिदोरी देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.वर्धापन दिनाचे औचित्य साधून ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ‘दारू नको दूध प्या’ हा विशेष उपक्रम राबवून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांचे व्यायाम व संस्कार शिबिर घेण्यात आले. यामध्ये बोधकथा आणि जनरल नॉलेजच्या प्रश्नांतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यात आली. तसेच, सामाजिक बांधिलकी जपत मंदार परिसर व गणेश घाटाची स्वच्छता करण्यात आली.
दुपारी चार वाजता विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. सायंकाळी ७ वाजता मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कविवर्य बाबासाहेब कोकरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे संचालक व माण तालुका व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष मनोहर काटकर सर यांनी केले. यावेळी विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करताना शिबिरामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली.
"आजच्या मोबाईलच्या युगात गुरफटलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना चांगल्या संस्कारांची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे," असे प्रतिपादन कवी बाबासाहेब कोकरे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी नवीन वर्षात व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली. देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी डॉ. दत्ताजी जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. या सोहळ्यासाठी नंदकुमार मासाळ, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काटकर, पोलीस पाटील विजयसिंह काटकर, पांडुरंग काटकर, लक्ष्मण कुंभार यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन नरवणे भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
