- Hindi News
- सातारा
- दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई ; पुणे जिल्ह्यातील सराईत टोळी जेरबंद ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई ; पुणे जिल्ह्यातील सराईत टोळी जेरबंद ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
दहिवडी: दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात दहिवडी पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 'डब्ल्यू.आर.एस.आर. पॉवर स्ट्रक्चर' कंपनीच्या अल्युमिनियम तारांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली तपास सुरू असताना, संशयित आरोपी पुन्हा एकदा चोरीच्या उद्देशाने दहिवडी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सहा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभिजीत साळुंखे, ओंकार कंक, यश कांबळे, गुणवंत पाटील, रोहन पाटील आणि दीपक जाधव या सहा जणांचा समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत ५ लाख रुपये किमतीच्या अल्युमिनियम तारा आणि गुन्ह्यात वापरलेले ८ लाख रुपयांचे वाहन, असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व आरोपी पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, दरोडा, मारहाण, आर्म्स ॲक्ट आणि विद्युत अधिनियमांतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांमधील सराईत गुन्हेगार आहेत.
पोलीस पथकाचे कौतुक
ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली मोहन हंगे, नंदकुमार खाडे, रवींद्र खाडे, नितीन धुमाळ आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे या धडाकेबाज कारवाईमुळे दहिवडी परिसरात समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.
