- Hindi News
- पुणे
- पुण्यात फेसबुकवरून कर्ज देण्याचे आमिष दाखवून ४१ लाखांची फसवणूक; फोटो मॉर्फ करून तरुणाला दिली धमकी
पुण्यात फेसबुकवरून कर्ज देण्याचे आमिष दाखवून ४१ लाखांची फसवणूक; फोटो मॉर्फ करून तरुणाला दिली धमकी
पुणे: कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका २८ वर्षीय तरुणाचा विश्वास संपादन करून, त्याचे फोटो मॉर्फ करून त्याला धमकावत तब्बल ४१ लाख १९ हजार ३७१ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा पुण्याच्या भवानी पेठ परिसरातील रहिवासी आहे. ५ जून २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा सर्व फसवणुकीचा प्रकार ऑनलाइन माध्यमातून घडला. आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधला होता. 'स्वस्त दरात कर्ज मिळवून देतो' असे आमिष दाखवून आरोपींनी तक्रारदाराला एका लिंकद्वारे एक ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
ब्लॅकमेलिंगचा वापर
एकदा लिंक डाऊनलोड झाल्यानंतर, आरोपींनी तक्रारदाराच्या मोबाईलमधील डेटाचा गैरवापर केला. तक्रारदाराचे फोटो मिळवून ते 'मॉर्फ' (छेडछाड) केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी आणि दबावाखाली येऊन तक्रारदाराने वेळोवेळी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांवर एकूण ४१,१९,३७१ रुपये जमा केले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक, लिंक धारक आणि बँक खातेधारकांविरुद्ध
भारतीय न्याय संहिता (BNS): ३१८(४), ३१९(२), ३(५)
माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act): ६६(डी) या कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिट्टे करत आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच
फेसबुक किंवा सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी लिंकवरून कर्ज घेऊ नका. अनोळखी व्यक्तीने पाठवलेले कोणतेही ॲप डाऊनलोड करू नका. जर कोणी फोटो मॉर्फ करून पैसे मागत असेल, तर घाबरून पैसे देऊ नका; त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा १९३० या क्रमांकावर संपर्क साधा. असे देखील सांगितले आहे.
