- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन! अतिवृष्टीबाधित एसटी कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत निर्णय घेण्याच...
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन! अतिवृष्टीबाधित एसटी कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत निर्णय घेण्याचे आवाहन
मुसळधार पावसामुळे कामावर पोहोचू न शकलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय! विशेष रजा मंजूर करण्यासाठी एसटी कर्मचारी काँग्रेसचे प्रताप सरनाईक यांना निवेदन.
मुंबई: जुलै महिन्यात राज्यभरात झालेल्या मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे कामावर उपस्थित राहू न शकलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी नैसर्गिक आपत्तीच्या काळात कर्तव्य बजावू न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याची परंपरा असताना, यंदा अद्याप कोणताही शासन निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवून पूरबाधित भागातील कर्मचाऱ्यांना तातडीने विशेष रजा मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात, विशेषतः ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या धुवाधार पावसामुळे कोकणासह राज्यातील अनेक भागांतील वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे आणि रायगड जिल्ह्यातील रोहा आगार सलग दोन दिवस बंद राहिल्याने अनेक चालकांना व वाहकांना आगारात पोहोचणे शक्य झाले नव्हते. दरवेळी अशा आपत्कालीन परिस्थितीत राज्य शासन किंवा स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष रजेबाबतचे परिपत्रक जारी केले जाते. मात्र, यंदा ना प्रशासनाकडून, ना एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबत कोणतेही निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत.
प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे पूर्ण वेतन मिळवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या हक्काच्या अर्जित रजा (Earned Leave) वापराव्या लागत आहेत, असा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोकणातील कोणत्याही विभागाने अद्याप गैरहजर कर्मचाऱ्यांचा रजेचा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवलेला नाही. एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान होऊन बळीराजा संकटात सापडला असताना, दुसरीकडे प्रवाशांच्या सेवेत रात्रंदिवस तत्पर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवरही अन्याय होत आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयात तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांचे वेतन अबाधित राखण्यासाठी स्पष्ट आदेश काढावेत, अशी जोरदार मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.
