- Hindi News
- देश
- दिल्लीत आंदोलनाचा भडका! १६ मेट्रो स्थानके बंद, शिक्षणमंत्र्यांच्या घराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी अडव...
दिल्लीत आंदोलनाचा भडका! १६ मेट्रो स्थानके बंद, शिक्षणमंत्र्यांच्या घराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी अडवला
दिल्लीत CJP आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे DMRC कडून १६ मेट्रो स्थानके बंद. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराकडे जाणारे रस्ते सील; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सुरू असलेल्या तीव्र आंदोलनामुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनाचे लोण आता संपूर्ण शहरात पसरत असल्याचे पाहून प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षेचे कारण देत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) तब्बल १६ प्रमुख मेट्रो स्थानके प्रवाशांच्या आवक-जावकासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानकांचे दरवाजे बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत असून, सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील अनेक संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक विद्यार्थी ठाम आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून पूर्णपणे सील केले आहेत. संपूर्ण परिसरात कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचंड ट्रोलिंग आणि वाढत्या प्रतिक्रियांमुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने आपले इन्स्टाग्राम खाते बंद केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आले नसले तरी नेटिझन्सच्या वाढत्या रोषामुळे हा पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
मेट्रो स्थानके बंद राहिल्याने आणि रस्त्यांवर लावलेल्या बॅरिकेडिंगमुळे दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. विद्यार्थी आंदोलनाला मिळणारा पाठिंबा आणि प्रशासनाकडून सुरू असलेली कडक कारवाई यांमुळे राजधानीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. आता सरकार या आंदोलनावर काय तोडगा काढते आणि आगामी तासांत प्रशासनाकडून काय नवे निर्देश दिले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
