- Hindi News
- देश
- गुजरातमध्ये अडकले जालना आणि संभाजीनगरचे पर्यटक; एनडीआरएफ आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने प्राण वाचवले
गुजरातमध्ये अडकले जालना आणि संभाजीनगरचे पर्यटक; एनडीआरएफ आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने प्राण वाचवले
गुजरातच्या वलसाड येथे औरंगा नदीला आलेल्या पुंरात महाराष्ट्रातील ३५ पर्यटक अडकले. एनडीआरएफ आणि हवाई दलाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने केले सुखरूप रेस्क्यू.
वलसाड: गुजरातमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांवर पुराचे मोठे संकट ओढवल्याची थरारक घटना समोर आली आहे. वलसाड जिल्ह्यातील औरंगा नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधील महाराष्ट्रातील तब्बल ३५ पर्यटक पुराच्या पाण्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच गुजरात प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवत हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अत्यंत कठीण आणि थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवून सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यासह छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातील ३५ पर्यटक एका खासगी ट्रॅव्हल बसने गुजरातच्या विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी गेले होते. यामध्ये जालन्यातील १७ तर उर्वरित पर्यटक संभाजीनगर आणि परभणी परिसरातील रहिवासी आहेत. वलसाड परिसरातून प्रवास करत असताना औरंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक मोठी वाढ झाली आणि रस्ता पाण्याखाली गेल्याने पर्यटकांची बस पुराच्या वेढ्यात सापडली. चौफेर वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.
रस्त्यावरील पाणी प्रचंड वाढल्यामुळे जमिनीवरून अथवा बोटीच्या साहाय्याने मदतकार्य पोहोचवणे अशक्य बनले होते. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गुजरातचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या (NDRF) पथकाने तात्काळ हेलिकॉप्टरची मदत मागवली. हेलिकॉप्टरच्या मदतीने पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांना एकापाठोपाठ एक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या यशस्वी आणि वेळेवर केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे सर्व ३५ पर्यटकांचे प्राण वाचले असून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
