- Hindi News
- सातारा
- साताऱ्यात नवमतदारांसाठी विशेष मोहीम; १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान चार दिवस नोंदणी शिबिर
साताऱ्यात नवमतदारांसाठी विशेष मोहीम; १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान चार दिवस नोंदणी शिबिर
सातारा जिल्ह्यात १९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिर. १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांना संधी.
सातारा: आगामी निवडणुकांच्या आणि भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि विशेषतः नवमतदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या तरुण-तरुणींचे वय १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण होत आहे, अशा सर्व नवमतदारांना आता मतदार यादीत आपले नाव नोंदविण्याची हक्काची संधी उपलब्ध झाली आहे. याशिवाय, विविध कारणांमुळे अद्ययावत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांसाठीही ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आगामी १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या चारही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संबंधित मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांची पूर्तता करून घेणार आहेत. यापूर्वी गैरहजर राहिल्यामुळे, स्थलांतर केल्यामुळे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे ज्या नागरिकांची नावे प्रारूप मतदार यादीतून सुटली आहेत, त्यांना आपल्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून या विशेष शिबिरांच्या माध्यमातून मतदार यादीत नाव पुन्हा समाविष्ट करता येणार आहे.
या विशेष मोहिमे दरम्यान केवळ नवीन नाव नोंदणीच नव्हे, तर विद्यमान मतदार यादीतील नावामधील स्पेलिंग, पत्ता किंवा इतर आवश्यक तपशीलामध्ये दुरुस्ती करायची असल्यास, तसेच नियमांनुसार नाव वगळण्या बाबतचे अर्जही या शिबिरांमध्ये स्वीकारले जाणार आहेत. प्रशासनाकडून विशेष करून महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक आणि इतर सर्व समावेशक घटकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग जास्तीत जास्त वाढवण्यावर भर दिला जात आहे.
नागरिकांनी या विशेष शिबिरांचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिबिरासाठी जाताना नागरिकांनी आपली कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि जाण्यापूर्वी प्रारूप मतदार यादीत आपले नाव एकदा तपासून घ्यावे, असे आवाहन सातारा जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपली नोंदणी सुनिश्चित करावी, जेणेकरून आगामी काळात प्रत्येक नागरिकाला आपला हक्काचा मतदानाचा अधिकार बजावता येईल.
