दिल्लीच्या प्रदूषणाचे नवे गूढ उलगडले; हवामानाचा ५१ तासांचा ‘लग इफेक्ट’ संशोधनातून समोर

दिल्लीतील वायू प्रदूषणावर हवामानातील बदलांचा तब्बल ५१ तासांनंतर परिणाम होतो, असा शोध IITM पुण्याच्या संशोधकांनी लावला आहे.

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील जीवघेणा वायु प्रदूषणाचा प्रश्न दरवर्षी हिवाळ्यात गंभीर रूप धारण करत असतो. या प्रदूषणमागे केवळ वाहनांचा धूर, उद्योगांचे उत्सर्जन किंवा इतर मानवी कारणेच जबाबदार आहेत, असा समज आहे; मात्र यामध्ये हवामानातील बदलांचाही मोठा वाटा असल्याचे एका नवीन आणि सखोल संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, हवामानातील बदलांचा परिणाम प्रदूषणाच्या पातळीवर तात्काळ होत नसून काही घटकांचा प्रभाव तब्बल ५१ तासांच्या विलंबाने (Lag effect) दिसून येतो. पुण्यातील प्रतिष्ठित भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनामुळे वायू प्रदूषणामागची गुंतागुंत अधिक स्पष्ट झाली असून, ‘एन्व्हायर्नमेंटल सायन्स : ॲटमॉस्फिअर्स’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन नुकतेच प्रकाशित झाले आहे.

        आयआयटीएम’चे प्रमुख संशोधक विवेक सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१७ ते २०२५ या नऊ वर्षांमधील दिल्लीतील हवामान आणि पीएम २.५ च्या आकडेवारीचा अभ्यास केला. या दरम्यान तापमान, आर्द्रता, पर्जन्य, वाऱ्याचा वेग, सौर किरणोत्सर्ग, पृष्ठभागावरील दाब आणि वातावरणाच्या खालच्या थराची उंची (बाउंड्री लेअर हाइट) या सर्व घटकांचा पीएम २.५च्या पातळीशी असणारा परस्पर संबंध तपासण्यात आला. या अभ्यासा नुसार, तापमानातील बदलाचा पीएम २.५ वर परिणाम होण्यासाठी तब्बल ५१ तासांपर्यंतचा विलंब होऊ शकतो. इतर हवामान घटकां मध्येही असाच विलंबाचा प्रभाव दिसून आला असून, तापमानासाठी ३ तास, आर्द्रतेसाठी ४ तास, पर्जन्यासाठी ५ तास, तर वाऱ्याच्या वेगासाठी सुमारे ११ तासांचा विलंब अत्यंत महत्त्वाचा असल्याचे संशोधनात आढळले आहे.

       या संशोधनात दिल्लीतील भौगोलिक आणि हवामान विषयक इतर कारणांवरही प्रकाश टाकला गेला आहे. हिवाळ्यात वातावरणाच्या खालच्या थराची (बाउंड्री लेअर) उंची कमालीची कमी होऊन ती ५०० मीटरपेक्षाही खाली जाते. यामुळे प्रदूषकांना वरच्या वातावरणात पसरण्यासाठी पुरेशी मोकळी जागा मिळत नाही आणि सर्व प्रदूषक जमिनीच्या जवळच अडकून पडतात, ज्यामुळे पीएम २.५ ची पातळी झपाट्याने वाढते. या काळात वाऱ्याचा वेग मंदावल्यास प्रदूषकांचा संचय आणखी वाढतो, तर याच्या उलट वेगवान वारे वाहिल्यास प्रदूषके विखुरण्यास मदत होते. दिवसभरातील वेळेचा विचार करता, दिल्लीत सकाळी ६ ते ९ आणि रात्री ८ ते ११ या वेळेत प्रदूषणाची पातळी उच्चांकी असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत पीएम २.५ ची पातळी अनेकदा २०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपेक्षा अधिक नोंदवली गेली, तर अभ्यासाच्या संपूर्ण काळात ती कमाल ८७९.६ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर पर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. याउलट, पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे हीच पातळी ५० पेक्षाही खाली उतरते.

      दरम्यान, या सर्व आव्हानांमध्ये एक सकारात्मक बाबही समोर आली असून, मागील नऊ वर्षांच्या कालावधीत दिल्लीतील पीएम २.५ च्या सरासरी पातळीत संथ पण सातत्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. २०१७ मध्ये १२७.७ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर असलेली ही सरासरी २०२५ मध्ये घसरून ८० पर्यंत खाली आली आहे. हवामान आणि प्रदूषणातील या विलंबाचा परस्परसंबंध वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट झाल्यामुळे भविष्यात प्रशासनाला प्रदूषणाचा अचूक अंदाज बांधण्यास आणि पूर्वसूचना प्रणाली अधिक प्रभावी करण्यास या संशोधनाची मोठी मदत होणार आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

दिल्लीच्या प्रदूषणाचे नवे गूढ उलगडले; हवामानाचा ५१ तासांचा ‘लग इफेक्ट’ संशोधनातून समोर

Latest News

दिल्लीच्या प्रदूषणाचे नवे गूढ उलगडले; हवामानाचा ५१ तासांचा ‘लग इफेक्ट’ संशोधनातून समोर दिल्लीच्या प्रदूषणाचे नवे गूढ उलगडले; हवामानाचा ५१ तासांचा ‘लग इफेक्ट’ संशोधनातून समोर
दिल्लीतील वायू प्रदूषणावर हवामानातील बदलांचा तब्बल ५१ तासांनंतर परिणाम होतो, असा शोध IITM पुण्याच्या संशोधकांनी लावला आहे.
अंतराळात युद्धाची तयारी? अमेरिका-चीनमध्ये वाढला तणाव; कक्षेत शस्त्र तैनातीने खळबळ
गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून; बारामतीत खळबळ, दोन तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात
शेतकरी, सामान्य जनता अन् सहकाराला मोठा दिलासा; फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
जमिनीच्या मोजणीचे आमिष, ९१ हजारांचा गंडा; पैसे मागताच सेवानिवृत्त पोलिसाला जीवे मारण्याची धमकी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software