- Hindi News
- पुणे
- जमिनीच्या मोजणीचे आमिष, ९१ हजारांचा गंडा; पैसे मागताच सेवानिवृत्त पोलिसाला जीवे मारण्याची धमकी
जमिनीच्या मोजणीचे आमिष, ९१ हजारांचा गंडा; पैसे मागताच सेवानिवृत्त पोलिसाला जीवे मारण्याची धमकी
पुण्यात उरुळी देवाची येथे शेतजमीन मोजणीच्या नावाखाली निवृत्त पोलिसाची ९१ हजारांची फसवणूक. एजंट राहुल पठारेविरोधात फुरसुंगी ठाण्यात गुन्हा.
पुणे: पुणे शहरातून फसवणुकीची एक अत्यंत संतापजनक आणि खळबजनक घटना समोर आली आहे. शेतजमिनीची मोजणी करून देण्याचे आमिष दाखवून तलाठी कार्यालयात एजंट म्हणून वावरणारा एक व्यक्ती सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला लाखमोलाचा गंडा घालून पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उरुळी देवाची परिसरातील जमिनीची पोट हिस्सा मोजणी करून देण्याच्या बहाण्याने ९१ हजार ७१० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेव्हा पीडित सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आपले पैसे परत मागितले, तब आरोपीने चक्क आत्महत्या करण्याची धमकी देत जमिनीवरील बोर्डाची तोडफोड केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, फिर्यादी धर्मराज शंकर जाधव (वय ६५, रा. संत तुकाराम नगर, मारुंजी, ता. मुळशी) हे पोलीस खात्यातून सन २०१९ मध्ये सन्मानपूर्वक निवृत्त झाले आहेत. त्यांची उरुळी देवाची येथील औताडे हांडेवाडी गावच्या हद्दीत शेतजमीन आहे. या जमिनीची पोट हिस्सा मोजणी करावयाची असल्याने ते १४ नोव्हेंबर २०२५ रोजी उरुळी देवाची येथील तलाठी कार्यालयात गेले होते. तिथे शासकीय कार्यालयात मध्यस्थी करून काम करून देणारा राहुल उत्तम पठारे (रा. होळकरवाडी, ता. हवेली) या एजंटची त्यांची गाठ पडली. राहुल पठारे याने आपण अनेक जणांच्या जमिनीची मोजणी सहज करून दिली असल्याचे सांगत जाधव यांचा विश्वास संपादन केला. तुमची मोजणीचे काम मी स्वतः करून देतो, असे गोड बोलून त्याने काही ओळखीच्या व्यक्तींची नावेही सांगितली. जर काम झाले नाही, तर तुमचे पैसे तसेच्या तसे परत करेन, अशी खात्री देत त्याने एक कोरा चेक विश्वासापोटी दिला. या भुलथापांना बळी पडून धर्मराज जाधव यांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि मोजणीच्या कायदेशीर व इतर खर्चासाठी वेळोवेळी मिळून एकूण ९१ हजार ७१० रुपये त्याच्या हातात सुपूर्द केले.
पैसे घेतल्यानंतर आरोपी राहुल पठारे याने जाधव यांना मामलेदार कचेरीत बोलावून काही अर्जांवर आणि चलनांवर सह्या करून घेतल्या. त्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी प्रत्यक्ष मोजणीसाठी येणार असल्याची खोटी माहिती त्याने दिली. त्यानुसार सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असलेले जाधव ठरलेल्या वेळी दुपारी दीड वाजताच जागेवर जाऊन तासंतास वाट पाहत थांबले, परंतु तिथे कोणीही अधिकारी आले नाहीत. जेव्हा त्यांनी राहुल पठारे याला फोन करून विचारणा केली, तेव्हा त्याने अत्यंत चलाखीने "साहेब, लोक येऊन गेले होते, तुम्ही उशिरा आलात, त्यामुळे ते स्थळ पाहणी करून निघून गेले," अशी फसवेशी बतावणी केली. त्यानंतर त्याने पुन्हा २९ नोव्हेंबर रोजी अधिकारी येणार असल्याचे सांगितले, परंतु त्या दिवशीही कोणीच फिरकले नाही. सततच्या या लबाडीमुळे संशय आल्याने जाधव यांनी थेट मोजणी कार्यालयात जाऊन स्वतः रीतसर चौकशी केली, तेव्हा त्यांच्या नावाचा कोणताही मोजणी अर्ज किंवा चलन भरण्यात आले नसल्याचे सत्य समोर आले.
आपली मोठी फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनी राहुल पठारेकडे गाठून जाब विचारला आणि आपले पैसे तात्काळ परत मागितले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या आरोपीने नंतर वडिलांची जमीन विकून पैसे देतो असे सांगत दोन चेक दिले. मात्र, जेव्हा फिर्यादींनी ते चेक बँकेत भरले, तेव्हा ते दोन्ही चेक बाऊन्स (नकारले) झाले आणि बँकेने उलट फिर्यादीकडून २ हजार ३६० रुपयांचा दंड वसूल केला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर जाधव यांनी थेट त्याच्या घरी जाऊन कागदपत्रे व पैशांची मागणी केली. यावर संतापलेल्या आरोपीने मग्रुरी दाखवत, "तुम्ही वारंवार माझ्या घरी येऊन नका, मला खूप टेन्शन आले आहे, मी स्वतःचे आयुष्य संपवून टाकेन," अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर रागाच्या भरात त्याने फिर्यादीच्या शेतजमिनीवर लावलेल्या मालकी हक्काच्या बोर्डाची तोडफोड करत मोठे नुकसान केले. या सर्व प्रकारामुळे मानसिक त्रास झालेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने अखेर फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली असून, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
