- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- सोलापुरात महायुतीत बिघाडी! जागावाटपावरून भाजपला डच्चू; शिंदे गट अन् अजित पवार गट आले एकत्र
सोलापुरात महायुतीत बिघाडी! जागावाटपावरून भाजपला डच्चू; शिंदे गट अन् अजित पवार गट आले एकत्र
सोलापूर: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच सोलापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील चर्चा फिसकटली असून, आता सोलापुरात 'शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट)' अशी नवी युती आकारास आली आहे. भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.
५१-५१ चा नवा फॉर्म्युला
सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार निवडणूक लढवणार आहेत. या दोन्ही पक्षांत प्रत्येकी ५१ जागांवर एकमत झाले असून, सोलापूरचा महापौर देखील या युतीचाच असेल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपसोबत का फिस्कटले समीकरण?
जागावाटपाच्या चर्चेबाबत माहिती देताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, "आम्ही सुरुवातीला भाजपकडे ४२ जागांची मागणी केली होती, परंतु भाजपने केवळ ८ जागा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आम्ही ३० जागांचा मध्यममार्ग काढला, तरीही त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर स्वाभिमानासाठी आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला."
विकासासाठी एकत्रित पाऊल
राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात काल रात्री झालेल्या बैठकीनंतर या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्याच्या सत्तेत आम्ही सोबत आहोतच, शिवाय नगरविकास आणि अर्थ खाते आमच्याच नेत्यांकडे असल्याने सोलापूरच्या विकासाला या युतीमुळे मोठी गती मिळेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
महत्त्वाचे मुद्दे:
भाजपसोबतची युती तुटली; शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र.
दोन्ही पक्ष प्रत्येकी ५१ जागांवर निवडणूक लढवणार.
पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर सोलापुरातही महायुतीचे गणित बिघडले.
सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जय महाराष्ट्र.
