डिजिटल युगात शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे; रावल

धुळे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित 'जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा' पार पडला. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांचा सत्कार; शिक्षकांना AI तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन.

धुळे: शिक्षण क्षेत्रात डिजिटल शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या अत्याधुनिक माध्यमातून वेगाने बदल होत आहेत. या बदलत्या प्रवाहाशी शिक्षकांनी सातत्याने अद्ययावत राहून नवे ज्ञान आत्मसात करावे आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रभावी वापर करावा, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. जिल्हा परिषद धुळे यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

        स्थानीय नियोजन भवनात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यास आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैभव वाचकर, प्राचार्या सुचेता पाटील, जिल्हा कृषी अधिकारी कावेरी राजपूत यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, शिक्षकांचे कार्य केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार देणे, त्यांच्यात उच्च मूल्ये रुजविणे आणि त्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवणे ही त्यांची मूळ जबाबदारी आहे. मूर्तिकार जसा कठीण दगडाला पैलू पाडून सुंदर मूर्ती साकारतो, त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना पैलू पाडून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवितो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत आई-वडिलांच्या पाठोपाठ गुरूला अत्युच्च स्थान देण्यात आले आहे.

          धुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी व शेतमजूर कुटुंबांतील मुले शिक्षण घेत असल्याने त्यांना दर्जेदार शिक्षण आणि प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. धुळे हा आकांक्षित जिल्हा असून शिक्षणाच्या गुणवत्तेत जिल्ह्याला राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांच्या बरोबरीनेच नव्हे, तर त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शिक्षकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करत त्यांनी प्राचीन गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण केले.

         यावेळी बोलताना आमदार राघवेंद्र पाटील यांनी शिक्षकांना समाजाचे खरे शिल्पकार संबोधले. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्यावर योग्य संस्कार करून सक्षम व प्रगतीच्या मार्गावर नेणारी पिढी घडवितात. बदलत्या काळातील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविण्याचे मोठे कार्य शिक्षक करत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व समर्पित सेवा बजावलेल्या जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने’ गौरवण्यात आले.

         यामध्ये धुळे तालुक्यातील चौगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या श्रीमती चंद्रकला परदेशी, शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेचे दिनेश धनगर, साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या श्रीमती मुब्बशेरा खान आणि शिरपूर तालुक्यातील लौकी येथील जिल्हा परिषद शाळेचे चंपालाल पाटील यांना पालकमंत्री जयकुमार रावल व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे केवळ वैयक्तिक सन्मान नसून समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या संपूर्ण शिक्षकवर्गाचा गौरव असल्याचे सांगत, पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपल्या कार्यातून समाजात एक नवा आदर्श निर्माण करावा आणि धुळे जिल्ह्याला शैक्षणिक गुणवत्तेत उच्च भरारी मिळवून देण्यासाठी आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवात मोठे कारस्थान सुरू असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software