मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिरातून गरजू रुग्णांना उपचाराचा आधार

धाराशिवमध्ये 'मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिर २०२६' चे उद्घाटन. आशा सेविकांना स्मार्टफोन अन् उमरग्यात १०० खाटांचे महिला रुग्णालय उभारण्याची राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची घोषणा.

धाराशिव: पैशांअभावी राज्यातील एकही गरजू रुग्ण वैद्यकीय उपचारापासून वंचित राहणार नाही, ही राज्य शासनाची ठाम भूमिका असून आरोग्य शिबिरामध्ये उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाची विशेष काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली आहे. उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात आयोजित उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिर-२०२६’ च्या उद्घाटना प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा आरोग्य विभाग आणि शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी भूषविले, तर विधानपरिषद सदस्य आमदार बसवराज पाटील, विधानसभा सदस्य आमदार प्रवीण स्वामी, मुरूम नगरपरिषदेचे अध्यक्ष बापूराव पाटील, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वानंद सोनार आणि लातूर विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रम संपन्न झाला.

        यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी आधुनिक उपचार पद्धतींचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. आरोग्य व्यवस्थेत अहोरात्र परिश्रम करणाऱ्या आशा सेविकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांना स्मार्टफोन देण्याची मागणी तातडीने पूर्ण केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जात असून, मुख्यमंत्री सहायता निधीतूनही गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी मोठी आर्थिक मदत केली जात आहे. विशेषतः अवयव प्रत्यारोपणा सारख्या गंभीर आजारांसाठी २४ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

           ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा जवळच उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगत त्यांनी उमरगा येथे १०० खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्यासाठी निश्चितपणे प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. तसेच मुरूम आणि लोहारा येथे प्रत्येकी ५० खाटांची उपजिल्हा रुग्णालये आणि उमरगा येथे अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

        शासनाने राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला असून जिल्ह्यातील वीजेच्या समस्या व मंजूर उपकेंद्रांची कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावली जातील, असेही त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे हा प्रदेश सुजलाम-सुफलाम होईल आणि आगामी पिढ्यांना दुष्काळ पाहण्याची दुर्दैवी वेळ येणार नाही, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आपल्या मनोगतातून या मतदारसंघातील आरोग्याच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी अशा शिबिरांची गरज अधोरेखित केली. कोकणात समुद्रात वाया जाणारे पावसाचे पाणी ‘मराठवाडा ग्रीड’च्या माध्यमातून मराठवाड्यात आणून हा परिसर सुजलाम-सुफलाम केला जाईल, असे त्यांनी सांगितले. आमदार बसवराज पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांनीही आपल्या भाषणात मतदारसंघातील आरोग्य आणि शेतीच्या समस्या मांडत शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

        आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रारंभी शरण पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते क्षय रुग्णांना पोषण आहार किट आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा आरोग्य सोहळा यशस्वी पार पडला.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवात मोठे कारस्थान सुरू असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software