- Hindi News
- देश
- राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात महाराष्ट्राचा गौरव; राज्यातील ९ गुणवंत शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात महाराष्ट्राचा गौरव; राज्यातील ९ गुणवंत शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ चे वितरण. महाराष्ट्रातील ९ शिक्षकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान; बीड, नाशिक, लातूर, आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांचा समावेश.
नवी दिल्ली: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्य पूर्ण उपक्रम, गुणवत्ता पूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील कर्तबगार शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार राष्ट्रीय सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा समावेश असून, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास या तिन्ही क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या शिक्षकांच्या कार्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, उच्च शिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रस्तरीय सोहळ्यात देशभरातून निवड झालेले ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षक, अशा एकूण ८२ शिक्षकांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोकड, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी, शिक्षण सचिव अनिल कुमार आणि कौशल्य विकास सचिव देबाश्री मुखर्जी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देत नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि विचारांना योग्य आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात, असे गौरवोद्गार काढले. अंदमान-निकोबार पासून लडाख पर्यंत दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पणाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
शालेय शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांमध्ये बीड जिल्ह्यातील साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे यांचा समावेश असून, त्यांनी ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या २९ वर्षांपासून 'पालक रक्षक' आणि 'शिक्षण आपल्या दारी' यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून अथक कार्य केले आहे. तसेच नाशिक महानगरपालिका शाळेच्या कुंदा जयवंत बच्छाव यांनी विद्यार्थ्यांमध्ये यंत्रमानव तंत्रज्ञान आणि डिजिटल अध्यापन पद्धतीचा प्रभावी वापर करत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले आहे.
लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव वसंतराव कुलकर्णी यांनी खेळणी व कलांच्या माध्यमातून गणित विषयाची भीती दूर करणारी अभिनव पद्धत विकसित केली असून, सातारा सैनिक स्कूलचे शिवप्रसाद अरविंद टिंगरे यांनी प्रत्यक्ष प्रयोगांवर आधारित विज्ञान शिक्षणातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांचे यश घडवले आहे.
उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातही महाराष्ट्राच्या शिलेदारांनी आपला असा वेगळा ठसा उमटवला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विक्रम विशाल यांनी वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी कार्बन पकड व साठवणूक तसेच अपारंपरिक हायड्रोकार्बन प्रणालीवर उल्लेखनीय संशोधन केले आहे.
वर्ध्याच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अमर मोहनराव ताकसांडे यांनी ग्रामीण बालआरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणात मोलाचे योगदान दिले असून, सोलापूर शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व जैवमिती अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता विकसित केली आहे. कौशल्य विकास व उद्योजकता क्षेत्रात धाराशिव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे किरण प्रकाश झारकर यांनी डिजिटल व औद्योगिक प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवली आहे, तर त्र्यंबकेश्वरच्या शासकीय आयटीआयच्या अर्चना राकेश जाधव यांनी आदिवासी व दुर्गम भागातील युवतींना फॅशन व वस्त्ररचना तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या सर्व गुणवंत शिक्षकांच्या गौरविल्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
