- Hindi News
- पुणे
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; सुनेत्रा पवार
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; सुनेत्रा पवार
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन. शेतीत AI व यांत्रिकीकरण आणि साखर उद्योगात इथेनॉलवर भर देण्याचे आवाहन.
पुणे: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादन खर्चात कपात आणि शेतीचे अर्थकारण अधिक मजबूत करण्यावर गांभीर्याने भर देणे आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. बदलती हवामान परिस्थिती आणि सतत वाढणाऱ्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर कृषी व साखर क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धित उत्पादने आणि अचूक शेती नियोजनाचा स्वीकार करत शेतकरी हिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वरनगर येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
या उच्चस्तरीय शेतकरी मेळाव्यास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार सचिन पाटील, माजी आमदार संभाजी कुंजीर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (PDCC) बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष किसन तांबे, तसेच कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व सभासद उपस्थित होते. मेळाव्यात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी, शेतकरी हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तरच गावाची आणि पर्यायाने राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
शासन, शेतकरी, सहकारी संस्था आणि साखर उद्योगाने परस्पर समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक त्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. स्व. अजितदादा हे स्वतः एक शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडी अडचणींची आणि गरजांची अत्यंत जवळून जाण होती, याची आठवण करून देत त्यांनी शेतकरी हिताच्या योजना पुढे नेण्यावर भर दिला. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक सिंचन पद्धती, यांत्रिकीकरण, माती परीक्षण, सुधारित वाणांची निवड आणि अचूक पीक नियोजन यांचा वापर वाढवल्यास शेतीची उत्पादनक्षमता वाढून उत्पादन खर्च नक्कीच कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या काळात साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी अतिवृष्टी, तीव्र दुष्काळ, हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि साखरेच्या बाजारपेठेतील सातत्याने होणारे चढ-उतार यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना साखर कारखान्यांना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी साखर कारखान्यांनी केवळ पारंपरिक साखर उत्पादनावरच अवलंबून न राहता इथेनॉल, बायोगॅस, सीएनजी, सेंद्रिय खते आणि इतर विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नेहमीच आर्थिक शिस्त, पारदर्शक व कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकार क्षेत्रात आपली एक वेगळी व विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. कारखान्याच्या आजवरच्या या प्रगतीमध्ये सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी आणि व्यवस्थापनाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी आगामी काळातही शेतकरी सभासदांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी कारखान्याने दीर्घकालीन नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची आपली परंपरा कायम ठेवत परिसराच्या सर्वांगीण विकासा साठीही सहकारी संस्थांनी नेहमीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सोमेश्वर कारखान्याच्या उत्कृष्ट प्रगतीचे भरभरून कौतुक केले. शेतकरी, सभासद, कामगार आणि कुशल व्यवस्थापनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच या संस्थेने सहकार क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. कारखान्याची ही आर्थिक बळकटी, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता कायम राखत भविष्यातील विकासासाठी सर्वांनी मिळून नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आमदार सचिन पाटील यांनीही कारखान्याच्या शिस्तबद्ध कामकाजाचे आणि शेतकरी हिताच्या धोरणांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविक करून कारखान्याच्या माध्यमातून आजवर राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांची आणि साधलेल्या यशस्वी कामगिरीची सविस्तर माहिती दिली. या शेतकरी मेळाव्यास परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
