- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- दहीहंडीच्या थरांमध्ये घडले अपघात; ३२ गोविंदा जखमी
दहीहंडीच्या थरांमध्ये घडले अपघात; ३२ गोविंदा जखमी
मुंबईत दहीहंडीचा थरार रंगत असताना दुपारी ३ वाजेपर्यंत ३२ गोविंदा जखमी. २८ जणांना प्रथमोपचारा नंतर डिस्चार्ज, आरोग्य यंत्रणा सतर्क.
मुंबई: गोपाळकाल्याचा उत्साह आणि दहीहंडीच्या जल्लोषात मुंबईत विविध ठिकाणी उच्चस्तरीय मानवी मनोरे रचण्याचा थरार सुरू असतानाच, दुपारी ३ वाजेपर्यंत ३२ गोविंदा जखमी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. उंचच उंच थर थरकाप उडवणारे मनोरे रचून दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात अनेक गोविंदांचा समतोल बिघडल्याने त्यांना दुखापत झाली. या सर्व जखमी गोविंदांना तात्काळ महानगरपालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले, जिथे वैद्यकीय यंत्रणेने त्वरित कारवाई करत २८ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडले (डिस्चार्ज दिला). सद्यस्थितीत विविध रुग्णालयां मध्ये केवळ चार जखमी गोविंदांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.
विभागीय आकडेवारी नुसार, मुंबई शहर परिसरातील रुग्णालयांमध्ये सर्वाधिक २९ गोविंदा उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी २५ जणांवर आवश्यक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले असून, उर्वरित चार जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, पूर्व उपनगरातील रुग्णालयांमध्ये दोन गोविंदा जखमी झाल्याची नोंद झाली, ज्यांना प्राथमिक उपचारानंतर त्वरित डिस्चार्ज देण्यात आला असून तिथे सध्या उपचाराधीन एकही रुग्ण नाही. त्याचप्रमाणे पश्चिम उपनगरातील रुग्णालयांमध्ये एका गोविंदाला दुखापत झाली होती, त्याच्यावरही उपचार केल्यानंतर त्याला सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही भागांतील आरोग्य यंत्रणांनी तातडीने प्रतिसाद देत जखमींना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.
दहीहंडी उत्सवा दरम्यान हजारो गोविंदा पथके एकापाठो पाठ एक थर रचत असताना सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत गोविंदांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मुंबई महापालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये आणि शासकीय आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात आली आहेत. उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना प्रशासनाकडून प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मिळालेल्या माहिती नुसार, दिवसभरात उत्सवा दरम्यान कोणतीही मोठी किंवा अत्यंत गंभीर स्वरूपाची अप्रिय घटना घडलेली नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून गोविंदा पथक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य व पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.
