पुण्यात गणेशोत्सवातील डीजेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; पोलिसांची भूमिका समोर

पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीवरून वाद तीव्र. 'पुणेकर मंच'चा बालगंधर्व ते मनपा मोर्चा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांचा इशारा.

पुणे: पुण्यात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरा विरोधातील वाद चांगलाच टोकाला गेला असून, एका बाजूला डीजे बंदीची जोरदार मागणी होत असताना दुसरीकडे गणेश मंडळांकडून त्याला तीव्र विरोध दर्शविला जात आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात लाऊडस्पीकर विरोधात आक्रमक भूमिका घेत पुणेकर मंचाच्या वतीने बालगंधर्व चौक ते पुणे महानगरपालिका असा एक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर पुणे पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली असून, नागरिकांच्या निवेदनावर योग्य तो विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

        या आंदोलनापूर्वी सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजे बंदीचा मुद्दा तीव्रतेने लावून धरला होता, ज्यामुळे त्यांना काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. आजच्या या मोर्चानध्ये विद्यानंद बापट प्रत्यक्ष सहभागी झाले नव्हते आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या निवास स्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बापट यांनी स्वतःच या मोर्चानध्ये सामील न होण्याबाबत पोलिसांना पूर्वकल्पना दिली होती. बालगंधर्व चौकापासून निघून महानगरपालिकेवर धडकलेल्या या मोर्चात सुमारे तीनशे ते साडेतीनशे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी पुणे पोलिसांना डीजे बंदीबाबत निवेदन सादर केल्यानंतर पुणे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी माध्यमांशी बोलताना पोलिसांची भूमिका स्पष्ट केली.

         याविषयी बोलताना पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले म्हणाले की, नागरिकांनी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या विरोधात बालगंधर्व ते मनपा असा मोर्चा काढून आपले निवेदन सादर केले असून, त्यांच्या या मागणीवर नियमानुसार योग्य तो विचार केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाचे या संदर्भात अत्यंत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि लाऊडस्पीकर मुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या पातळीवर प्रत्येक झोनमध्ये गणेश मंडळांच्या बैठका घेऊन सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी आणि ईद-मिलादच्या सणातही अत्यंत कमी प्रमाणात लाऊडस्पीकर व डीजेचा वापर करण्यात आला होता. ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आणि ध्वनीची ठरवून दिलेली मर्यादा ओलांडली, त्यांच्यावर पोलिसांनी तातडीने कायदेशीर कारवाई केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

       दरम्यान, या संपूर्ण वादावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा वाद आता खूप टोकाला गेला असून आगामी काळात दिवाळीपर्यंत अनेक महत्त्वाचे सण व उत्सव येत असल्याने सर्वांनी समंजस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यात जन्म झालेल्या आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या शहराबद्दल अशा प्रकारच्या वादाची प्रकरणे सातत्याने समोर येत असल्याने चिंता व्यक्त करतानाच, सध्या कायद्याचा धाक आणि पोलिसांच्या वर्दीची भीती कोणालाही उरली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. उत्सव काळात कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी सर्व संबंधितांनी एकत्र येऊन चर्चा आणि समन्वयाच्या माध्यमातून मार्ग काढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवात मोठे कारस्थान सुरू असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software