- Hindi News
- पुणे
- पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी धडक मोर्चा
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी धडक मोर्चा
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा. ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी रस्त्यावर.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या, भरती प्रक्रियेतील सातत्य पूर्ण विलंब आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज पुण्यात विद्यार्थ्यां मार्फत एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरापासून या आंदोलनाला सुरुवात झाली असून, हजारो विद्यार्थी एकत्र येत घोषणाबाजी करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय पदांवर होणाऱ्या भरती प्रक्रियेतील रखडलेले निकाल, जागांची अपुरी संख्या, परीक्षा वेळापत्रकातील अनिश्चितता आणि इतर प्रशासकीय त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या तीव्र असंतोष पसरला असून, याच रोषातून विद्यार्थ्यांनी हा एल्गार पुकारला आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यां बाबत अनेकदा निवेदने देऊनही ठोस कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा मार्ग पत्करला आहे. वेळेवर परीक्षा घेणे, पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणे, रिक्त पदांची भरती तातडीने पूर्ण करणे आणि परीक्षांच्या निकालातील विलंब टाळणे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर पोलिसांचा भारी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी प्रशासनाला आपले मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करणार असून, या आंदोलना नंतर राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
