- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मानवी मूल्ये आणि सांस्कृतिक संवादच जगाला जोडणारा खरा सेतू; फडणवीस
मानवी मूल्ये आणि सांस्कृतिक संवादच जगाला जोडणारा खरा सेतू; फडणवीस
मुंबईत 'ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६'चे उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्रिक्स देशांचे प्रतिनिधी सहभागी; सांस्कृतिक देवाणघेवाणीवर भर
मुंबई: जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा आणि जीवन पद्धती भिन्न असल्या तरी मानवतेला जोडणाऱ्या सार्वत्रिक मूल्यांचा शोध घेणे आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची व्याप्ती वाढवणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. केवळ आर्थिक सहकार्य किंवा व्यापाराच्या माध्यमातून जग अधिक सुंदर व समृद्ध होऊ शकत नाही, तर मानवी मूल्ये, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवादातूनच अधिक समतोल, शांततामय आणि समृद्ध जगाची निर्मिती शक्य आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ (GIF) च्या दुसऱ्या पर्वाच्या दिमाखदार उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपस्थितांना मनःपूर्वक शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशावर प्रकाश टाकला. या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषदेस मुंबई येथील ब्राझीलचे महावाणिज्य दूत जोसे मौरो फोनेस्का कोस्टा कौटो, रशियाचे महावाणिज्य दूत इव्हान फेतिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन ती, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्य दूत गेडियन लाबाने यांच्यासह भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या प्रमुख राष्ट्रांचे राजनैतिक प्रतिनिधी, देशातील नामवंत उद्योगपती, विचारवंत, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
सध्याचे जग अनेक स्तरांवर विखुरलेले असून जागतिक व्यवस्था विविध अर्थांनी असंतुलित झाल्याचे दिसून येते, अशी खंत व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले की, अशा या आव्हानात्मक परिस्थितीत विविध देशांनी एकत्र येऊन परस्पर समज वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्कृती, मते आणि विचारसरणी जरी वेगवेगळ्या असल्या, तरी संवादाच्या माध्यमातून समान मूल्यांवर आधारित संबंध अधिक दृढ करता येऊ शकतात. विविध देशांतील नागरिक, राजकीय नेतृत्व, विचारवंत आणि व्यावसायिक क्षेत्रातील धुरिणांनी अशा व्यासपीठांवर एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करणे आज काळाची गरज बनली आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
भारतीय संस्कृतीच्या पायाबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या शाश्वत भारतीय जीवनदृष्टीचा पुनरुच्चार केला. संपूर्ण विश्व हे एकच कुटुंब आहे, हा भारताचा प्राचीन विचार आहे. भारताने आपल्या इतिहासात केवळ वस्तू आणि व्यापाराचा प्रसार केला नाही, तर विचार, ज्ञान आणि उच्च जीवनमूल्यांचाही जगभर प्रचार व प्रसार केला आहे, असे त्यांनी नमूद केले. प्राचीन काळातील बौद्ध धर्माचा जगभरात झालेला प्रसार हे याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत, हा प्रसार कधीही युद्ध, संघर्ष किंवा हिंसेच्या माध्यमातून झाला नसून तो विचार आणि मूल्यांच्या प्रभावातूनच झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यात ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या संचालक जान्हवी पवार यांनी फोरमच्या व्यापक उद्दिष्टांवर प्रकाश टाकत, सांस्कृतिक समानता आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून ब्रिक्स राष्ट्रांमध्ये नव्या भागीदारीच्या संधी निर्माण करण्यासाठी हा मंच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमा दरम्यान भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, संगीत, नृत्य आणि लोक जीवनातील साम्य स्थळांचे दर्शन घडवणारे आकर्षक दृकश्राव्य सादरीकरण उपस्थितां समोर सादर करण्यात आले. या यशस्वी आणि प्रभावी आयोजना बद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जान्हवी पवार आणि एपी ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
