- Hindi News
- देश
- श्रीनगर विमानतळावर इंडिगोचे विमान खांबाला धडकले; सर्व प्रवासी सुरक्षित
श्रीनगर विमानतळावर इंडिगोचे विमान खांबाला धडकले; सर्व प्रवासी सुरक्षित
श्रीनगर विमानतळावर नवी मुंबईहून आलेल्या इंडिगो विमानाची पार्किंग करताना खांबाला धडक. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप, तांत्रिक तपास सुरू.
श्रीनगर: श्रीनगर विमानतळावर एक मोठी विमान दुर्घटना बालकिल्ल्याने टळली असून, नवी मुंबईहून प्रवाशांना घेऊन आलेले इंडिगो एअरलाइन्सचे विमान पार्किंग दरम्यान रनवेवरील एका खांबाला धडकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि विमान कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असून, कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाच्या आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, इंडिगो एअरलाइन्सचे विमान क्रमांक 6E 225 (VT-NOG) आपला प्रवास पूर्ण करून नवी मुंबईहून श्रीनगर विमानतळावर सुखरूप दाखल झाले होते. त्यानंतर सकाळी साधारणपणे ९:०२ वाजता हे विमान विमानतळावरील निर्धारित ‘बे क्रमांक ०६’ वर पार्क केले जात असताना हा अपघात घडला. विमान पार्किंगच्या जागेकडे नेले जात असताना त्याचा भाग तेथील एका खांबाला जाऊन धडकला. विशेष म्हणजे, ज्या खांबाला विमानाची धडक बसली, तो साधा खांब नसून ‘व्हिज्युअल डॉकिंग गाइडन्स सिस्टम’ (VDGS) या आधुनिक यंत्रणेचा एक भाग आहे. विमानतळावरील पार्किंग बेमध्ये विमान योग्य आणि सुरक्षित ठिकाणी उभे करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विमानाच्या हालचालींवर लक्ष ठेवून पायलटला पार्किंगची अचूक दिशा आणि स्थिती समजण्यास ही प्रणाली मदत करते.
धडक बसल्याची माहिती समोर येताच विमानतळ यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. यासाठी विमानतळावर तातडीने मॅन्युअल शिडीचा वापर करण्यात आला. या दुर्घटनेत विमानाचे नेमके किती आणि काय स्वरूपाचे नुकसान झाले आहे, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप एअरलाइन्स किंवा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, विमान पार्क करताना नेमकी ही चूक कशी झाली आणि धडक कशामुळे बसली, याचा तांत्रिक तपास विमानतळ प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.
या संपूर्ण घटनेमुळे काही काळ खळबळ उडाली असली, तरी श्रीनगर विमानतळाच्या नियमित कामकाजावर किंवा उड्डाण व्यवस्थेवर याचा कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. विमानतळावरील विमानांचे आगमन आणि प्रस्थानाची प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत सुरू असून सर्व उड्डाणे वेळापत्रकानुसारच पार पडत आहेत, अशी माहिती प्रशासना कडून देण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतर दुर्घटने मागची नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.
