विद्यानंद बापट हल्ल्याचे कारण समोर; संतोष चव्हाणचा खळबळजनक दावा

पुण्यात विद्यानंद बापट मारहाण प्रकरणी आरोपी संतोष चव्हाणचा व्हिडिओ समोर. डीजे व साऊंड सिस्टीम बंदीमुळे ८ हजार कुटुंबांच्या रोजगारावर परिणाम होत असल्याचा दावा.

पुणे: पुणे शहरात गणेशोत्सवातील कर्णकर्कश आवाज आणि डीजेच्या विरोधात सातत्याने उघडपणे भूमिका मांडणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक नवीन आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बापट यांच्यावर प्रत्यक्ष हल्ला करत त्यांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाण या हल्ले खोराने घटनेनंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून या हल्ल्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवावर किंवा ध्वनीक्षेपक आणि ढोल-ताशांच्या वापरावर संपूर्ण बंदी आणल्यास हजारो लोकांच्या रोजगारावर आणि त्यांच्या घरांच्या चुलीवर कसा विपरीत परिणाम होतो, याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष चव्हाणला ताब्यात घेत कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

          पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात माध्यमांशी बोलत असताना विद्यानंद बापट यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी अटकेत असलेला किंवा अटकेपूर्वी समोर आलेल्या व्हिडिओ मध्ये संतोष चव्हाण याने गणेश मंडळांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बाजूने आपली भूमिका मांडली आहे. निवडणुका आल्यावर मतांसाठी मागे लागणारे राजकीय नेते संकट काळात कधीही गणेश मंडळांच्या पाठीशी उभे राहत नाहीत, अशी खंत त्याने व्यक्त केली. कोरोना महामारीच्या काळात असो किंवा इतर सामाजिक उपक्रमांच्या वेळी, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट करून समाजसेवा केली आहे. मात्र, सण जवळ आला की केवळ पर्यावरण आणि परंपरांचा मुद्दा पुढे करून गणेशोत्सवाला आणि ढोल-ताशांच्या गजर करणाऱ्या पथकांना लक्ष्य केले जाते, असा संताप त्याने व्यक्त केला.

        पुण्यातील गणेशोत्सवाच्या अर्थकारणावर प्रकाश टाकताना चव्हाणने म्हटले की, शहरात लहान-मोठी सुमारे ३,८०० ते ४,००० गणेश मंडळे असून त्यापैकी १,४०० मंडळे नोंदणीकृत आहेत. या नोंदणीकृत मंडळांचा केवळ १२ दिवसांचा खर्च हा १०० कोटी रुपयांहून अधिक असतो, तर घरगुती गणेशोत्सवाची उलाढाल ही सुमारे १,००० कोटींपर्यंत पोहोचते. आवाजाची मर्यादा पाळली जावी याबद्दल कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, परंतु साऊंड सिस्टीम किंवा वाद्यांवर सरसकट बंदी आणल्यास त्याचा थेट फटका या व्यवसायाशी जोडलेल्या घटकांना बसतो. डेकोरेशन व्यावसायिक, प्रकाश व्यवस्था पुरवणारे, ट्रॅक्टर-ट्रॉली चालक आणि इतर पूरक कामगार मिळून सुमारे ८,००० घरांचा रोजगार यावर अवलंबून असतो. त्यामुळे साऊंड सिस्टीम बंद करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे हजारो गरिबांच्या चुली बंद करण्यासारखे आहे, असा दावा त्याने केला.

         या संपूर्ण घटनेमुळे पुणे शहरात गणेशोत्सवा दरम्यानचा आवाज, नियमांची कठोर अंमलबजावणी आणि दुसरीकडे लाखो लोकांचा रोजगार या मुद्द्यांवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे विद्यानंद बापट यांच्यावरील या हल्ल्याची तीव्र निंदा होत असताना आणि पोलीस प्रशासनाने आरोपीवर कायदेशीर बडगा उगारला असताना, सार्वजनिक उत्सवाशी जोडलेल्या आर्थिक व सामाजिक बाजूंचा वादही ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात कडेकोट पावले उचलली जात आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

आरोग्यसेवेला आता ‘स्टार रेटिंग’; हलगर्जीपणावर थेट कडक कारवाई

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software