- Hindi News
- पुणे
- मानवी तस्करी प्रकरणात न्यायालयाचा दणका; जामीन फेटाळूनही मुख्य आरोपी मोकाट
मानवी तस्करी प्रकरणात न्यायालयाचा दणका; जामीन फेटाळूनही मुख्य आरोपी मोकाट
पुण्यात नोकरीच्या बहाण्याने तरुणीची पोर्तुगालमध्ये तस्करी केल्याप्रकरणी मुख्य आरोपी प्रतिमा भाटीचा जामीन फेटाळला. सर्व आरोपी अजूनही पसार.
पुणे: नोकरीचे आमिष दाखवून एका २८ वर्षीय तरुणीला पोर्तुगाल मध्ये नेऊन तेथील एका बिअर शॉपी विक्रेत्याला वेश्या व्यवसायासाठी विकल्या गेलेल्या अत्यंत संतापजनक प्रकरणातील मुख्य आरोपी तथा प्लेसमेंट एजन्सीच्या संचालिकेचा अटक पूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून आठवडा उलटून गेला तरीही पोलीस तिला अटक करू शकलेले नाहीत. या गंभीर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार प्रमिता ऊर्फ प्रतिमा भाटी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के. क्षीरसागर यांनी २४ ऑगस्ट रोजीच फेटाळला होता, मात्र न्यायालयाचा दणका बसूनही मुख्य आरोपींसह तिचे सर्व साथीदार अद्यापही पोलिसांच्या पकडीबाहेर असल्यामुळे यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी परिसरातील ‘यु जी ५’ या कार्यालयात हा संपूर्ण कट रचण्यात आला होता. नागपूर येथील एका २८ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या साहसी फिर्यादी वरून विमानतळ पोलीस ठाण्यात प्रमिता ऊर्फ प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अजहर शेख, कपिल मिश्रा (सर्व रा. पुणे) तसेच पोर्तुगाल येथील वामसि, चैतन्य आणि हिम्मतसिंग यांच्या विरोधात मानवी तस्करी व फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्लेसमेंट कार्यालयावर छापा टाकला असता, तिथे अनेक तरुण-तरुणींची कागदपत्रे आणि माहितीचे संच आढळून आले होते. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच सर्व आरोपींनी भूमिगत होत पळ काढला. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी प्रतिमा भाटी हिच्या विरुद्ध यापूर्वी २०२४ मध्येही विमानतळ पोलीस ठाण्यातच अशाच प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान अर्जदाराच्या वकिलांनी तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून तिचा या गुन्ह्याशी दूरदूरपर्यंत संबंध नसल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र, सरकारी वकिलांनी यास तीव्र विरोध करत, आरोपीला जामीन मंजूर केल्यास ती फिर्यादीच्या कागद पत्रांमध्ये फेरफार किंवा छेडछाड करू शकते, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आरोपीचा मोबाईल अद्याप हस्तगत करायचा बाकी आहे. तसेच, अनेक पीडित व्यक्ती अद्यापही आपले जबाब नोंदवण्यासाठी पुढे येत असून, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता कसून चौकशीसाठी तिला पोलीस कोठडीत घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादा नंतर, प्रथमदर्शनी उपलब्ध पुराव्यांवरून आरोपीची या गुन्ह्यातील विशिष्ट आणि सक्रिय भूमिका स्पष्ट होत असल्याचे नमूद करत न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
या अत्यंत संवेदनशील प्रकरणाच्या तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून,आरोपींनी इतरही अनेक तरुण-तरुणींना परदेशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याचे उघडकीस आले आहे. कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या कागद पत्रांमध्ये अनेक तरुणींचा समावेश असल्याने, या प्रकरणातील पीडिते प्रमाणेच त्यांनाही परदेशात नेऊन वेश्या व्यवसायासाठी किंवा मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकवले गेले असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मानवी तस्करीचे हे मोठे आंतरराष्ट्रीय जाळे उघडकीस आले असताना आणि न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळला जाऊनही एकही मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या पुणे पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून फरार आरोपींच्या शोधासाठी विविध पथके कार्यरत आहेत.
