- Hindi News
- पुणे
- बापट हल्ल्यानंतर पुणेकर संतप्त; डीजेमुक्तीसाठी रविवारी भव्य मोर्चा
बापट हल्ल्यानंतर पुणेकर संतप्त; डीजेमुक्तीसाठी रविवारी भव्य मोर्चा
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी पुण्यात महापालिकेवर 'डीजे मुक्ती मोर्चा'. ध्वनिप्रदूषणा विरोधात पुणेकर नागरिक आक्रमक.
पुणे: पुणे शहरात गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात कायदेशीर व वैचारिक लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. बापटांना झालेल्या मारहाणीचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून, या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि शहराला ध्वनिमुक्त करण्यासाठी येत्या रविवारी पुणेकरांनी एल्गार पुकारला आहे. रविवारी सकाळी ११ वाजता बालगंधर्व चौकातील झाशीची राणी पुतळ्याजवळ एकत्र येऊन पुणे महानगरपालिकेवर ‘डीजे मुक्ती मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करत या संपूर्ण प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. विद्यानंद बापट यांच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत असल्याचे स्पष्ट करत डॉ. सावंत यांनी पुणेकरांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सण-उत्सवांच्या नावाखाली होणाऱ्या उच्च आवाजाच्या गोंगाटामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी आवाज उठवणाऱ्या नागरिकांवर अशा प्रकारे हिंसक हल्ले होणे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी धारेवर धरण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी टिळक रोड परिसरातील कशाळे चौकात माध्यमांशी संवाद साधत असताना एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांने (संतोष चव्हाण) विद्यानंद बापट यांच्यावर थेट हल्ला करत त्यांना मारहाण केली होती. उपस्थित पत्रकार आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला, मात्र या घटनेचे व्हिडिओ फुटेज समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त झाला. या हल्ल्या नंतरही मागे हटण्यास तयार नसून आपला लढा अधिक जोमाने सुरूच ठेवणार असल्याचे विद्यानंद बापट यांनी स्पष्ट केले आहे. सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा दबावाचे राजकारण करण्यासाठी अशा प्रकारच्या हिंसक घटना घडवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संपूर्ण घटनाक्रमानंतर आता केवळ बापट वैयक्तिक पातळीवर न राहता, हजारो पुणेकर नागरिक डीजे व ध्वनिप्रदूषणा विरुद्धच्या लढ्यात रस्त्यावर उतरणार असल्यामुळे या मुद्यावरून शहरात मोठे वातावरण तयार झाले असून प्रशासनाचेही या आंदोलनाकडे लक्ष लागले आहे.
