खराडीतील पोलिस शिपाई निलंबित; पानटपरीचालकाकडून हप्ता वसुलीचा आरोप

पुण्यात खराडी पोलीस ठाण्यातील शिपाई आकाश मुळे ३०० रुपये लाच व सिगारेट उकळल्याप्रकरणी निलंबित. डीसीपी अबिनाश कुमार यांची धडक कारवाई.

पुणे: पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात एक अत्यंत लांछनास्पद प्रकार समोर आला असून, कर्तव्य बजावताना एका पानटपरी चालकाकडून ३०० रुपयांचा हप्ता आणि सिगारेटची पाकिटे उकळणाऱ्या पोलीस शिपायाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. आकाश मुळे असे निलंबित करण्यात आलेल्या दोषी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे खात्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे निरीक्षण नोंदवत प्रशासनाने तातडीने कठोर भूमिका घेतली आहे.

         मिळालेल्या माहिती नुसार, पोलीस शिपाई आकाश मुळे यांची खराडी पोलीस ठाण्यात रात्रपाळीची ड्युटी होती. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत अनधिकृतपणे सुरू असलेल्या आस्थापना आणि पानटपऱ्यांवर कारवाई करण्याची विशेष जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. या दरम्यान, झेन्सॉर रस्ता परिसरात एक स्मोक शॉप रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुळे यांनी तिथे जाऊन संबंधित चालकाला उशिरा पर्यंत दुकान सुरू ठेवल्याबद्दल जाब विचारत सिगारेट विकताना पकडले. त्यानंतर त्याच्याकडील सर्व सिगारेटची पाकिटे एका पिशवीत भरून त्यांनी चालकालाही सोबत घेतले. वाटेत नेत असताना त्यांनी चालकाकडे दरमहा ५०० रुपयांच्या हप्त्याची मागणी केली, तसेच आता खिशात किती पैसे देऊ शकतो, अशी विचारणा केली. त्यावर घाबरलेल्या पानटपरीचालकाने ३०० रुपये तात्काळ देतो आणि उरलेले २०० रुपये नंतर देतो, असे सांगितले. त्यानंतर आकाश मुळे यांनी ३०० रुपये स्वतःकडे घेऊन चालकाला तिथून सोडून दिले.

      दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची कुणकुण रात्रीच्या गस्तीवर असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला लागली. त्यांनी तातडीने सतर्कता दाखवत संबंधित पानटपरीचालकाला बोलावून त्याची चौकशी केली आणि त्याचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. चालकाने घडलेला सर्व प्रकार प्रांजळपणे सांगितल्यानंतर महिला अधिकाऱ्याने हलगर्जीपणा आणि लाचखोरीचा हा गंभीर प्रकार तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. प्रकरणाची गंभीर दखल घेत परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी शिस्तभंगाची आणि भ्रष्टाचाराची कारवाई करत पोलीस शिपाई आकाश मुळे यांना पोलीस खात्यातून तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले. वर्दीचा गैरवापर करून सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अशा प्रवृत्तींवर पोलीस प्रशासनाने कडक बडगा उगारल्याने लाचखोर कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

आरोग्यसेवेला आता ‘स्टार रेटिंग’; हलगर्जीपणावर थेट कडक कारवाई

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software