- Hindi News
- सातारा
- माण तालुक्यात काळीज हेलावणारी घटना; आईसोबत विहिरीवर गेलेल्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू
माण तालुक्यात काळीज हेलावणारी घटना; आईसोबत विहिरीवर गेलेल्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू
दहिवडी:
माण तालुक्यातील उकिर्डे गावाच्या शिवारात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून, आईसोबत विहिरीवर गेलेल्या एका ४ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हितांशु महावीर कांबळे असे या मृत बालकाचे नाव आहे. २४ मे रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास हितांशु हा त्याची आई शिवानी महावीर कांबळे यांच्यासोबत गावातील पंजाबराव जगदाळे यांच्या विहिरीजवळ गेला होता. मात्र, तिथे अचानक घात झाला आणि आई-मुलगा हे दोघेही विहिरीच्या खोल पाण्यात पडले. या घटनेनंतर दोघांनाही तातडीने विहिरीबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, हितांशुची प्रकृती कमालीची खालावल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. डोळ्यादेखत पोटचा गोळा हिरावल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती जितेंद्र श्रीरंग कांबळे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेहाचे शवविच्छेदन व पंचनामा पूर्ण केला आहे. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रासकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकल्याच्या अशा अकाली जाण्याने उकिर्डे गावासह संपूर्ण माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
(छायाचित्र AI ने तयार करण्यात आलेले आहे )
