हिंजवडी मेट्रोवरून सरकारवर काँग्रेसचा हल्लाबो

सर्व तांत्रिक मंजुरी मिळूनही हिंजवडी मेट्रो का रोखली? काँग्रेस नेते मोहन जोशी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारला जाब.

पुणे: हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नागरी सुविधा आणि रखडलेल्या प्रकल्पांवर केवळ कागदी आश्वासने देण्यापेक्षा बहुप्रतिक्षित हिंजवडी मेट्रो प्रत्यक्षात कधी धावणार, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार मोहन जोशी यांनी राज्य सरकारला केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार जेव्हा जेव्हा पिंपरी-चिंचवड आणि पुणे भागाचा दौरा करतात, तेव्हा हिंजवडी आयटी पार्कमधील सुविधां बाबत केवळ घोषणाबाजी केली जाते, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. हिंजवडीतील अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात असली, तरी सध्याच्या संथ शासकीय कारभाराची गती पाहता प्रत्यक्ष रस्ते तयार होण्यास किमान तीन ते चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सध्या हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतुकीची समस्या अत्यंत बिकट आणि असह्य बनली असून, तेथे काम करणाऱ्या हजारो कर्मचारी आणि स्थानिकांचा संयम आता सुटत चालला आहे. त्यामुळे आणखी वेळ न घालवता हिंजवडी मेट्रो त्वरीत सुरू करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

        शिवाजीनगर ते हिंजवडी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका ३ या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मेट्रो सुरक्षा आयुक्तांची कायदेशीर मंजुरी यापूर्वीच मिळालेली असून, मेट्रोच्या सर्व तांत्रिक चाचण्याही यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. सर्व प्रकारची प्रशासकीय व तांत्रिक तयारी पूर्ण झालेली असताना प्रत्यक्षात मेट्रो सेवा सुरू होण्यास होणारा उशीर संशयास्पद आहे. महामेट्रोच्या सुधारित वेळापत्रका नुसार चालू वर्षाच्या मार्च महिन्यापूर्वीच ही मेट्रो धावणे अपेक्षित होते. ठरलेली मुदत संपून त्यावर आता पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला असला, तरी प्रत्यक्षात प्रवाशांसाठी मेट्रो अजूनही सुरू झालेली नाही. मेट्रो प्रशासनाच्या मते ३१ मे पूर्वीच सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून मेट्रो सुरू झाली असती; परंतु राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात जाणीव पूर्वक वेळकाढूपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी आणि भव्य उद्घाटनाच्या निमित्ताने मिरवून घेण्यासाठीच सरकारकडून हा प्रकल्प जाणीव पूर्वक थांबवण्यात आला आहे का, असा गंभीर प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला असून, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांना मोठा दिलासा; २० लाखांचे वैद्यकीय संरक्षण

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software