- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- अवयवदानात महाराष्ट्र देशात अग्रेसर; हजारो रुग्णांना मिळाले नवजीवन
अवयवदानात महाराष्ट्र देशात अग्रेसर; हजारो रुग्णांना मिळाले नवजीवन
महाराष्ट्रात १९९५ पासून १७ हजारांहून अधिक जिवंत व ३ हजार मरणोत्तर अवयव प्रत्यारोपण यशस्वी. अवयवदानासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे जनजागृतीचे आवाहन.
मुंबई: महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यां नुसार राज्यात अवयवदानाचा आलेख सातत्याने उंचावत असून यामुळे हजारो रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहे. राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रादेशिक अवयव व उती प्रत्यारोपण समन्वय संस्था तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यभरात अवयवदानाबाबत मोठी सकारात्मकता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर आणखी व्यापक स्वरूपात अवयवदान प्रबोधन मोहीम राबविण्याचे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
राज्यात १९९५ पासून ऑक्टोबर २०२६ पर्यंत झालेल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची आकडेवारी पाहिल्यास या क्षेत्रात मोठे यश मिळाल्याचे स्पष्ट होते. या कालावधीत एकूण १७,३२५ जिवंत व्यक्तींमधील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या असून त्यामध्ये १४,९४९ मूत्रपिंड आणि २,३७६ यकृत प्रत्यारोपणांचा समावेश आहे. तसेच मरणोत्तर अवयव दानातून एकूण ३,३७३ गरजू रुग्णांना नवीन जीवनदान मिळाले आहे. यामध्ये १८५३ मूत्रपिंड, ९८७ यकृत, २२० हृदय, ६३ फुफ्फुस आणि नेत्र व उतींसह २५० इतर अवयवांच्या यशस्वी रोपणाचा समावेश आहे. सध्याच्या घडीला राज्यात विविध अवयवांसाठी प्रतीक्षारत असलेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडासाठी ४०७५, यकृतासाठी ८८८, हृदयासाठी ६३, फुफ्फुसासाठी २४, स्वादुपिंडासाठी १५, हातासाठी ११ आणि लहान आतड्यासाठी ८ रुग्ण प्रतीक्षेत असून, त्यांच्यासाठी अवयवदानाचे आवाहन सातत्याने केले जात आहे.
नागरिकांमध्ये अवयवदाना विषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘अंगदान-जीवन संजीवनी अभियाना’चा एक भाग म्हणून महाराष्ट्रात ३ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जुगजुग जियो अभियान’ अत्यंत उत्साहात राबवण्यात आले. यासोबतच २ ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान संपूर्ण राज्यात ‘अवयवदान पंधरवडा’ पाळण्यात आला, ज्या अंतर्गत १३ ऑगस्ट २०२६ रोजी १६ वा अवयवदान दिन साजरा करण्यात आला. या मोहिमे दरम्यान राज्यभरात संगणकीय माहिती पुस्तिकेचे प्रसार माध्यमांद्वारे प्रसारण करण्यात आले असून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, प्रसिद्ध व्यक्ती आणि धर्मगुरू यांचे प्रबोधनपर संदेश दूरचित्रफितींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. तसेच अवयव प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या प्रेरणादायी मुलाखती प्रसारित करून नागरिकांना सहजरीत्या सहभाग नोंदवता यासाठी अधिकृत संकेत स्थळाद्वारे व क्यूआर कोडच्या साहाय्याने अवयवदान प्रतिज्ञा नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याद्वारे विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाची शपथ घेतली आहे.
आरोग्य यंत्रणेतील तळागाळातील घटकांना सक्रिय करण्यासाठी जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांसाठी विशेष व्याख्यानांचे आयोजन करून त्यांच्याकडून अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. युवा पिढीमध्ये याचे महत्त्व रुजवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये अवयवदान प्रबोधन फेरी, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये प्रबोधनपर फलक व भित्तिपत्रके लावण्यात आली असून, दरवर्षी प्रमाणे अवयवदान करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबांचा विशेष सन्मान करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
शासकीय पातळीवर अवयवदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी पथनाट्ये, चित्रपटगृहांमधील जाहिराती, आकाशवाणीवरील संदेश, परिसंवाद आणि लघुपट प्रदर्शनाद्वारे ‘महाअवयवदान महोत्सव’ यशस्वीरीत्या राबवण्यात आला असून, या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे राज्यातील अवयवदाना विषयीच्या अंधश्रद्धा दूर होऊन एका नव्या सामाजिक क्रांतीची सुरुवात झाल्याचा विश्वास मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला आहे.
