पुणे पोलिस भरतीत बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा घोटाळा, दोघांना अटक

पुणे शहर पोलिस भरतीत बनावट क्रीडा प्रमाणपत्रांद्वारे १९ जणांनी मिळवली नोकरी. राज्य कुराश असोसिएशनच्या अध्यक्षासह सचिवाला गुन्हे शाखेकडून अटक.

पुणे: पुणे शहर पोलिस दलातील भरती प्रक्रियेत खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत तब्बल १९ उमेदवारांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आला आहे. ‘कुराश’ या पारंपरिक कुस्तीच्या खेळाचे तसेच ‘ड्रॅगनबोट’ या सामूहिक नौकानयनाच्या खेळाची खोटी प्रमाणपत्रे तयार करून ती भरती प्रक्रियेत सादर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या गंभीर प्रकरणात गुन्हे शाखेने दोघा जणांना बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

      महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर (वय ४०, रा. चंडीगड, मूळ रा. अहिल्यानगर) आणि सचिव शिवाजी साळुंखे (वय ४६, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. यांच्यासह परभणी जिल्हा संघटक कल्याण बालासाहेब मुरकुटे, धाराशिव जिल्हा संघटक चांदपाशा लालासाहेब शेख, इतर जिल्ह्यांतील संघटक तसेच या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदेशीर रीत्या नोकरी मिळवणारे अन्य आरोपीं विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, हा संपूर्ण गैरप्रकार २०१६ ते २०२६ या कालावधीत घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात नोकरीला लागलेल्या उमेदवारां पैकी नऊ जण सध्या प्रशिक्षणासाठी सुद्धा गेल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

       पुणे शहर पोलिस दलातील २०२४-२६ मधील पोलिस भरतीदरम्यान १९ उमेदवारांनी कुराश आणि ड्रॅगनबोट या क्रीडा प्रकारांची अत्यंततुच्छ दर्जाची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याची तक्रार एका सतर्क नागरिकाने भक्कम पुराव्यांसह दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत अनेक काळेबेरे बाहेर आले. संबंधित आरोपींनी कोणत्याही प्रकारच्या अधिकृत क्रीडा स्पर्धांचे आयोजन न करता परस्पर बोगस कागदपत्रे आणि क्रीडा अभिलेख तयार केल्याचे आढळले.

         शिवाजीनगर येथील ऐतिहासिक पोलिस मैदानावर पार पडलेल्या भरती प्रक्रिये दरम्यान हीच खोटी प्रमाणपत्रे सादर केली गेली. या माध्यमातून राज्य सरकारच्या खेळाडूंसाठीच्या पाच टक्के आरक्षणाचा गैरमार्गाने लाभ घेत शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. या मोठ्या रॅकेटमध्ये पोलिस दल किंवा क्रीडा विभागातील अन्य कुणाचा सहभाग आहे का, याचा कसून शोध सध्या गुन्हे शाखे मार्फत घेतला जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

ध्वनि मर्यादा ओलांडणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, साउंड सिस्टिम जप्त होणार

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software