- Hindi News
- पुणे
- संतोष पंडित यांच्या अटकेचे पडसाद; पुण्यात शेकडो समर्थकांचे जोरदार आंदोलन
संतोष पंडित यांच्या अटकेचे पडसाद; पुण्यात शेकडो समर्थकांचे जोरदार आंदोलन
पुण्यात संतोष पंडित यांच्या अटकेविरोधात समर्थकांचे गुडलक चौकात आंदोलन. तात्काळ सुटकेची मागणी करत समर्थकांची घोषणाबाजी; डेक्कन परिसरात पोलीस बंदोबस्त.
पुणे : सामाजिक माध्यमांवरील लोकप्रिय व्यक्ती संतोष पंडित यांच्या अटकेचे पडसाद पुण्यात उमटले असून, त्यांच्या शेकडो समर्थकांनी प्रसिद्ध गुडलक चौकात एकत्र येत जोरदार आंदोलन केले. गुरुवारी पहाटे पंडित यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याने समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. पंडित यांच्या अटकेच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आंदोलकांनी राज्य सरकार आणि पुणे पोलिसांच्या भूमिकेचा निषेध केला. संतोष पंडित यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी करत समर्थकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, ध्वनी प्रदूषण आणि ध्वनिवर्धकांच्या वापरा विरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही आंदोलकांनी निषेध केला. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. संतोष पंडित यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे ताब्यात घेण्यात आले, तसेच त्यांच्या विरोधातील कारवाईची कायदेशीर प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पडली, याबाबत शासन आणि पोलिसांनी सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी समर्थकांनी केली.
या आंदोलनामुळे गुडलक चौक आणि डेक्कन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. वाहतुकीवर परिणाम होऊ नये आणि परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली. संतोष पंडित यांच्या अटके नंतर पुण्यात समर्थकांकडून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, पुढील काळात पोलिस आणि शासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
