- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- लाडकी ‘माधुरी’ अखेर घरी परतली; ४०० दिवसांनंतर नांदणी मठात जल्लोष
लाडकी ‘माधुरी’ अखेर घरी परतली; ४०० दिवसांनंतर नांदणी मठात जल्लोष
गुजरातच्या वनतारा केंद्रातून ४०० दिवसांनंतर माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या नांदणी मठात परतली. १,१६० किमी प्रवासानंतर भव्य व भावनिक स्वागत.
कोल्हापूर: गुजरातच्या प्रसिद्ध ‘वनतारा’ हत्ती पुनर्वसन केंद्रातून तब्बल ४०० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची बहुचर्चित माधुरी हत्तीण मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी तब्बल ११६० किलोमीटरचा लांब प्रवास करून आपल्या हक्काच्या नांदणी (ता. शिरोळ) मठात परतली आहे. एखाद्या सेलिब्रिटीलाही लाजवेल अशा दिमाखदार स्वागतात, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत माधुरीची अत्यंत भावनिक वातावरणात घरवापसी झाली. या आनंदाच्या क्षणी उपस्थित महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह अनेक ‘माधुरी’प्रेमींना आनंदाश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजता गुजरातमधील वनतारा केंद्रातून ॲनिमल ॲम्ब्युलन्समधून माधुरीची रवानगी करण्यात आली होती. बडोदा, सुरत, वापी, नवसारी, वसई, विरार, ठाणे, पुणे, सातारा आणि कराड असा तब्बल तीस तासांचा खडतर व अविरत प्रवास करत ही विशेष वाहनांची मालिका नांदणी मठात येऊन पोहचली. नांदणीच्या सीमेवर आणि मुख्य चौकात हत्तीणीची वाहने पोहोचताच जेसीबीच्या माध्यमातून तिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. केवळ नांदणीच नव्हे, तर कोल्हापूर, सांगली आणि शेजारील बेळगाव जिल्ह्यांतूनही हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय नागरिक या ऐतिहासिक स्वागतासाठी उपस्थित होते. गावातील प्रमुख मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. निशिधीका परिसरात वनतारा, वनविभाग आणि आरोग्य पथकाच्या उपस्थितीत माधुरीला अत्यंत सुरक्षितपणे वाहनातून खाली उतरवण्यात आले.
वाहन बाहेर आल्यानंतर निशिधीका परिसरात विशेष तयार केलेल्या 'माधुरी निवास'च्या मार्गावर दोन्ही बाजूंना केळीचे घड, पपई, बीट, सफरचंद, संत्री, मोसंबी, उसाच्या कांड्या, ताजे गवत, कलिंगड आणि विविध प्रकारच्या पौष्टिक भाज्यांचा मोठा मेजवानीचा साठा ठेवण्यात आला होता. नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, वरुर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि कोल्हापूर मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत माधुरीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या नेत्रदीपक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि मोबाइल मध्ये क्षण टिपण्यासाठी नागरिकांची मोठी धडपड उडाली होती. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात २५ हून अधिक पोलीस अधिकारी, १०० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि ५० हून अधिक होमगार्ड्सचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीनंतर आणि काही अटी व शर्तींच्या अधीन राहून माधुरीला नांदणी मठात परत आणण्यात आले आहे. नियमां नुसार माधुरीकडून भविष्यात कोणतेही काम करून घेतले जाणार नाही, तसेच तिची चोवीस तास देखभाल आणि दर पंधरा दिवसांनी नियमित आरोग्य तपासणी केली जाईल. मठात परतल्यानंतरही तिच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी वनताराचा पशुवैद्यक विभाग सातत्याने सहकार्य करणार आहे. माधुरीच्या स्वागतासाठी नांदणी मठात हत्तीणीसाठी अत्याधुनिक स्वरूपाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या असून, यात विशेष स्वैपाकघर (किचन), स्विमिंग पूल, आरोग्य तपासणी केंद्र आणि संचार करताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी विशेष दक्षता बाळगण्यात आली आहे. वनताराच्या पुनर्वसन केंद्रात ३७६ हत्तींच्या देखभालीचा अनुभव गाठीशी असलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली माधुरीने या संपूर्ण प्रवासात आणि आता मठातील नव्या वातावरणात उत्तम जुळवून घेतले असून, तिच्या पुनरागमनाने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
