- Hindi News
- पुणे
- कोंढव्यात मोबाईल चोरट्यांचा पर्दाफाश; तरुणाचा मोबाईल हिसकावणारे दोघे जेरबंद
कोंढव्यात मोबाईल चोरट्यांचा पर्दाफाश; तरुणाचा मोबाईल हिसकावणारे दोघे जेरबंद
पुण्यात कोंढवा पोलिसांची धडक कारवाई; दिवसाढवळ्या व्हिडिओ कॉलवर बोलणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावणारे दोन चोरटे गजाआड..
पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात दिवसाढवळ्या रस्त्यावर उभे राहून मोबाईलवर व्हिडिओ कॉल करत असलेल्या एका तरुणाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पसार झालेल्या दोन चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा ऐवज हस्तगत केला असून, या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी वर्तनावर मोठा आळा बसण्यास मदत झाली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ सप्टेंबर २०२६ रोजी ही खळबळ जनक घटना घडली होती. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार तरुण कोंढव्यातील प्राईम हॉस्पिटल समोरील कमेला परिसरात उभे राहून आपल्या मोबाईलवर व्हिडिओ कॉलवर बोलत तन्मय होता. याच दरम्यान पाठीमागून अॅक्टिव्हिसदृश दुचाकीवरून आलेल्या दोन संशयित तरुणांपैकी दुचाकी चालविणाऱ्या तरुणाने पांढरा शर्ट, तर मागे बसलेल्या तरुणाने लाल रंगाचा शर्ट परिधान केला होता. पाठीमागे बसलेल्या या चोरट्याने चालत्या दुचाकीवरूनच अचानकपणे तरुणाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि दोघेही कोंढवा परिसराच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. याप्रकरणी पीडित तरुणाने तातडीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली, ज्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गांभीर्याने तपास सुरू केला. परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज कसून तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हेगारांचा माग काढण्यात आला. या तपासादरम्यान पोलिसांनी सफी उल्ला हापीज उल्ला शहा (वय १८) आणि मेहताब जलालूदीन चौधरी (वय २०) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त करण्यात आली.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. शहरात वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि केलेल्या यशस्वी कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.
