- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- कल्याणच्या आंबेडकर उद्यानाच्या विकासाला नवी दिशा; २ एकर जमीन देण्याचे निर्देश
कल्याणच्या आंबेडकर उद्यानाच्या विकासाला नवी दिशा; २ एकर जमीन देण्याचे निर्देश
कल्याण-पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विस्तारासाठी २ एकर जागेचा आरक्षण बदलाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी KDMC ला दिले.
मुंबई: कल्याण-पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा सर्वांगीण विकास, विस्तार आणि सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. या उद्यानाचा विस्तार करण्यासाठी लगतची सुमारे २ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी आवश्यक त्या आरक्षण बदलाचा सविस्तर प्रस्ताव लवकरात लवकर तयार करून शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रशासनाला दिले आहेत.
मुंबई येथील विधान भवनात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली यासंदर्भातील एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. मागील काही काळापासून आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याची सतत मागणी केली जात होती. या लोकभावनेची व मागणीची गंभीर दखल घेत उपाध्यक्ष बनसोडे यांनी महापालिका प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासाचे काम विहित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. 'स्मार्ट सिटी' प्रकल्पांतर्गत या उद्यानाचे नियोजित सुशोभी करण अत्यंत प्रभावी पणे पूर्ण व्हावे, यासाठी नगरविकास विभाग, महापालिका प्रशासन आणि संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आवश्यक ती सर्व कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी. या बैठकीला नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त, नगररचना अधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णया मुळे आगामी काळात कल्याण मधील या महत्त्वाच्या उद्यानाचा कायापालट होण्यास आणि नागरिकांना व अनुयायांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
