जेन जि आंदोलनावरून मोदी सरकारला पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा

नाशिकमधील पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका. 'जेन झी' आंदोलन, शिक्षण क्षेत्रातील दुरवस्था आणि २०२९ च्या निवडणुकीवर भाष्य.

नाशिक: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर आणि धोरणांवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमध्ये एका पत्रकार परिषदेत अत्यंत महत्त्वाची राजकीय विधाने केली आहेत. दिल्ली तील 'जेन जी' (Gen Z) च्या तीव्र आंदोलनामुळे केंद्र सरकारची झोप उडाली असून, हा मोदी सरकारच्या शेवटाची सुरुवात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आगामी २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सत्ता परिवर्तन निश्चित असून, यासाठी कोणताही राजकीय पक्ष किंवा विरोधक नव्हे, तर खुद्द पंतप्रधान मोदींचा कारभारच कारणीभूत ठरेल, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

      नाशिक मधील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की, यापूर्वी देशातील शेतकऱ्यांनी ऐतिहासिक आंदोलन केले होते, ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या तीव्र आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याने सरकारला जनक्षोभाची तीव्रता स्पष्टपणे जाणवली आहे. भाजप मधील संभाव्य नेतृत्व बदलाच्या चर्चांवर बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपपंतप्रधान पदाच्या संभाव्य हालचालींचा संदर्भ दिला. तसेच, प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याच्या निर्णयावर ताशेरे ओढत, शिक्षण क्षेत्राची धुरा सक्षमपणे सांभाळू शकेल असा एकही भरवशाचा आणि विश्वासार्ह मंत्री आज भारतीय जनता पक्षाकडे उरलेला नाही, असा दावा त्यांनी केला.

       यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंड दौऱ्यानंतर तेथील जागेचे भाजप कार्यकर्त्यां कडून करण्यात आलेल्या कथित 'शुद्धीकरण' प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. ही कृती भाजपची घृणास्पद आणि अत्यंत विकृत मानसिकता दर्शवणारी असल्याचे सांगत, देशात एकाधिकारशाही आणि हिटलर शाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

     सत्तेचा गैरवापर करत केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना वेठीस धरण्याचे राजकारण सुरू असल्याचा सूर त्यांनी लावला. महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य दिल्ली वारीवर भाष्य करताना, ते केंद्रात गेल्यास ती त्यांची बढती ठरेल, परंतु त्यांना शिक्षणमंत्रिपद देण्यास आमचा तीव्र विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात घडलेल्या 'नीट' पेपरफुटी सारख्या गंभीर घटनांचा काळ फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाशी जोडलेला असल्यामुळे हे खाते त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

       शिक्षण क्षेत्राची सध्याची दुरवस्था आणि प्रशासकीय प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशाचे सरकार शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या मूलभूत मुद्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थखात्याची पुरती वाट लावली असून, अशीच स्थिती शिक्षण खात्याची करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. आज शिक्षण क्षेत्रात माफियांची मोठी घुसखोरी झाली असून, राजकीय आश्रयाशिवाय पेपर फुटीचे प्रकार अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातील तरुण पिढी घडवायची असेल आणि 'एआय' (AI) सारख्या जागतिक तंत्रज्ञानाचे आव्हान लीलया पेलवायचे असेल, तर केंद्र सरकारला एखादा निष्णात शिक्षणतज्ज्ञ किंवा स्वतंत्र व सक्षम मंत्री आणावाच लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष शरद हैर, प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड आणि शहराध्यक्ष नीलेश खैरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश

Latest News

SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश
नागपुरात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेताना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी SIR-२०२६ ची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे...
पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर; २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण
कल्याणच्या आंबेडकर उद्यानाच्या विकासाला नवी दिशा; २ एकर जमीन देण्याचे निर्देश
शेतीच्या विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार; ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प
पेट्रोल पंपातील भागीदारीच्या आमिषाने पुण्यातील इंजिनिअरची सव्वा दोन कोटींची फसवणूक

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software