- Hindi News
- पुणे
- राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप; पैसे देऊन मुलं-इन्फ्लुएंसर्स आणल्याचा...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप; पैसे देऊन मुलं-इन्फ्लुएंसर्स आणल्याचा दावा
राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप. पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आणि इन्फ्लुएंसर्सचा वापर केल्याचा दावा.
पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्या निमित्त आयोजित 'छात्रों की गूंज' या विशेष कार्यक्रमावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमावर तीव्र शब्दांत भाष्य करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. राहुल गांधींच्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयांमधून मुलींना आणि मुलांना पैसे देऊन आणण्यात आले असून, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना केवळ सकारात्मक (पॉझिटिव्ह) मजकूर पोस्ट करण्याची सक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या ९० ते ९५ टक्के मुली या प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांच्या शिक्षण संस्थांमधील किंवा महाविद्यालयां मधील आहेत आणि त्यांनाच या कार्यक्रमात प्रवेश दिला जात आहे. हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे केवळ एक इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग असून, एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ज्याप्रमाणे जाणीव पूर्वक वाद निर्माण करून तो प्रसिद्ध केला जातो, अगदी तसाच प्रकार काँग्रेस नेत्यां कडून करण्यात येत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाबद्दल केवळ पॉझिटिव्ह कन्टेन्टच सोशल मीडियावर टाका, तरच तुम्हाला पैसे दिले जातील; जर कोणी नकारात्मक (निगेटिव्ह) पोस्ट केली तर पैसे मिळणार नाहीत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या कार्यक्रमाच्या खर्चा बाबत उपस्थित केलेल्या मुद्यांवरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक उधळण केली जात असून या पैशांचा नेमका स्रोत काय आहे, याबाबत विचारणा करण्यात आली होती. नवनाथ बन यांनी जे आरोप पुराव्यांच्या आधारे केले आहेत, त्याची योग्य ती पडताळणी प्रशासनाकडून केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमा पूर्वी शहरात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
