- Hindi News
- पुणे
- राहुल गांधींच्या समर्थनार्थ संजय राऊत मैदानात; भाजपवर जोरदार हल्लाबोल
राहुल गांधींच्या समर्थनार्थ संजय राऊत मैदानात; भाजपवर जोरदार हल्लाबोल
राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर घालण्यात आलेल्या अटींवरून संजय राऊत आक्रमक. भाजपवर ताशेरे ओढत दिला 'वंदे मातरम्'चा ऐतिहासिक संदर्भ.
पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्या निमित्त आयोजित ‘छात्रो की गुंज’ या विशेष कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमख नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींचे उघडपणे समर्थन करत भाजप आणि केंद्र सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी जेव्हापासून राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून मी त्यांचा समर्थक राहिलो असून, ते या देशाचे खऱ्या अर्थाने नेतृत्व करणार आहेत हे सर्वात पहिले सांगणारा माणूस मी आहे, अशी ठाम भूमिका संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
पुण्यातील कार्यक्रमाच्या तयारीवर आणि पोलिसांकडून घालण्यात आलेल्या अटींवर ताशेरे ओढताना संजय राऊत म्हणाले की, देशाचे विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल ३० प्रकारच्या अटी घातल्या आहेत. राहुल गांधी हे काय परदेशातून आलेले आहेत का किंवा ते या देशाचे नागरिक नाहीत का? इतर पक्षांचे मोठे नेते किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात येतात, तेव्हा त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या जाचक अटी घातल्या जातात का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजप सरकार आणि प्रशासनाच्या पाया खालची वाळू पूर्णपणे सरकली असून, राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेला आणि प्रभावाला हे सरकार घाबरले असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी सप्टेंबर महिन्यानंतर केंद्रातील भाजप सरकारच्या पडझडीला प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि मोदी-शहांचे चेहरे काळे ठिक्क पडल्याचे दिसून येईल, अशी टीपिकल राजकीय टिप्पणीही त्यांनी केली.
यावेळी बोलताना राऊतांनी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’वरून पेटलेल्या वादावरही आपली प्रतिक्रिया दिली. बेरोजगारी, महागाई आणि युवकांच्या रोजगाराचे प्रश्न हेच सध्याच्या काळातील 'युवा की आवाज' असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी कधीही दूरदूरचा संबंध राहिला नाही, अशा पक्षांनी ‘वंदे मातरम्’वरून अनावश्यक उठाठेव करू नये, असे सुनावत त्यांनी ऐतिहासिक संदर्भ दिले. १९३२-३७ च्या दरम्यान काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’ची दोन कडवी अधिकृतपणे स्वीकारण्यात आली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे या विषयावरून राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहास तपासून घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, जेव्हा राजकीय वर्तुळात अनेकजण त्यांना हिणवत होते आणि विरोधक वेगवेगळ्या उपाध्या देत होते, तेव्हाही राहुल गांधी हेच देशाचे आगामी नेतृत्व आहेत, असे सांगणारा मी पहिला व्यक्ती होतो. आज त्यांच्या पाठीशी देशभरातील तरुण वर्ग उभा राहत असून, भाजपच्या लोकांना जर असे वाटत असेल की ते पोलिसांच्या मदतीने किंवा ताकदीने कसलीही गुंडगिरी करून विरोधकांना दाबू शकतील, तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे. ही त्यांची अखेरची घरघर असून भविष्यात ही दडपशाही आणि गुंडगिरी निश्चितपणे मोडून काढली जाईल, असा इशाराही संजय राऊत यांनी शेवटी दिला.
