पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर; २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण. फुले दांपत्याला भारतरत्न देण्याच्या शिफारसीचा पुनरुच्चार.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या गौरवशाली जीवनावर आधारित २८ भव्य 'ज्ञानशिल्पांचे' अनावरण नुकतेच पार पडले. या विशेष समारंभात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या ज्ञान शिल्पांचे लोकार्पण झाले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आयुष्यभर लढा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा, त्यांच्या कार्याचा आणि परिवर्तन वादी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

      लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. या ज्ञानशिल्पांमध्ये लावलेल्या एका आरशाकडे पाहताना त्यांना 'मी कोण?' हा प्रश्न पडला आणि त्याच क्षणी त्यांना जाणीव झाली की त्या 'सावित्रीची लेक' आहेत. एका छोट्या गावातील शेतकरी कुटुंबातून येऊन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, त्यामागे सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा आहे, असे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षण, मानवता, समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा संदेश या ज्ञानशिल्पांतून थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          यावेळी त्यांनी महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाची आठवण करून दिली. मुलींच्या शिक्षणासाठी काम करताना त्यांनी सोसलेला विरोध आणि हाल अपेष्टांचा उल्लेख करत, त्यांच्या संघर्षाच्या बळावरच आजच्या महिला विज्ञान, प्रशासन, उद्योग आणि संरक्षण अशा सर्व क्षेत्रांत यशस्वीपणे आपली कामगिरी सिद्ध करत आहेत, असे नमूद केले. राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी', 'लाडकी बहीण', 'पिंक रिक्षा' आणि 'लखपती दीदी' यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. तसेच, फुले दाम्पत्याला 'भारतरत्न' मिळावा, ही महाराष्ट्राची भावना असून राज्य विधानसभेने तशी एकमताने शिफारस केंद्राकडे केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

       विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी या उपक्रमाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, ही ज्ञानशिल्पे केवळ भिंतीवरील चित्रे नसून, ती इतिहास आणि वर्तमानाचा संवाद घडवून आणणारी एक माध्यम आहेत. भिडे वाड्यातील पहिली शाळा, प्लेगच्या महामारीतील लोकसेवा, सत्यशोधक चळवळ आणि सावित्रीबाईंचे साहित्यिक योगदान यांसारख्या अनेक पैलूंचे दर्शन या शिल्पांतून घडते. विद्यापीठ परिसरात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या ज्ञानशिल्पांमधून सावित्रीबाईंच्या विचारांची ओळख होऊन शिक्षणाचा उपयोग समाज परिवर्तनासाठी करण्याची प्रेरणा मिळेल.

       आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी सांगितले की, या प्रकल्पाची निर्मिती म्हणजे केवळ एक कलात्मक उपक्रम नसून, फुले दाम्पत्याच्या संघर्षाची गाथा नव्या पिढीच्या स्मरणात ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सर्व २८ ज्ञान शिल्पांची बारकाईने पाहणी केली आणि शिल्पकार नवीन शेगमवार, आर्किटेक्ट धनंजय सालकर तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. या सोहळ्यामुळे पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून, सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत पिढ्यान पिढ्या तेवत ठेवण्याचा एक संकल्प या निमित्ताने दृढ झाला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश

Latest News

SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश SIR प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे निर्देश
नागपुरात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेताना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी SIR-२०२६ ची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे...
पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर; २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण
कल्याणच्या आंबेडकर उद्यानाच्या विकासाला नवी दिशा; २ एकर जमीन देण्याचे निर्देश
शेतीच्या विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार; ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प
पेट्रोल पंपातील भागीदारीच्या आमिषाने पुण्यातील इंजिनिअरची सव्वा दोन कोटींची फसवणूक

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software