- Hindi News
- पुणे
- राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून पुण्यात तणाव; ५०-६० जणांवर गुन्हा
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून पुण्यात तणाव; ५०-६० जणांवर गुन्हा
पुण्यात राहुल गांधींच्या 'छात्रों की गुंज' सभेपूर्वी सीओईपी परिसरात अभाविप आणि एनएसयूआय कार्यकर्त्यांत राडा. ५० ते ६० काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल.
पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गुंज’ या विशेष कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुणे शहरातील सीओईपी (COEP) महाविद्यालय परिसरात मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि एनएसयूआय (युवक काँग्रेस)चे कार्यकर्ते एकमेकाशी हानामारी करत होते. दोन्ही गटांमध्ये झालेल्या बाचाबाची आणि हाणामारी मुळे परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, अभाविपच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ५० ते ६० काँग्रेस कार्यकर्त्यां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या हस्ते आरटीओ जवळील एआयएसएसएमएस (AISSMS) प्रशालेच्या मैदानावर ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सीओईपी महाविद्यालयाच्या वसतिगृह आणि परिसर परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले. काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते वसतिगृहातील विद्यार्थ्यांना राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सक्ती करत असून त्यांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप अभाविपच्या वतीने करण्यात आला. या मुद्यावरून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोन्ही गट समोरा समोर आले. या दरम्यान एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली जात असल्याची माहिती मिळताच गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करत मारहाण करणाऱ्यांना पांगवले आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखली.
या संपूर्ण घटने बाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस आणि अभाविपच्या कार्यकर्त्यां मध्ये बाचाबाची सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटना स्थळी दाखल झाले. एका व्यक्तीला जबर मारहाण केली जात असल्याने त्याला वाचवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या प्रकरणी अभाविप कडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ५० ते ६० काँग्रेस कार्यकर्त्यां विरोधात कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर काँग्रेस कडून या प्रकरणी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या तणाव पूर्ण घटनेची माहिती समजताच काँग्रेस व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने घटना स्थळी आणि रुग्णालयात धाव घेऊन जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस केली. आगामी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुणे पोलिसांकडून संबंधित परिसरात अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
