- Hindi News
- पुणे
- पुण्यात दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
पुण्यात दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
पुण्यात कात्रज येथे एमबीबीएस विद्यार्थिनीचा तर नवी पेठेत एमपीएससी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू. वाढत्या ताणतणावामुळे शैक्षणिक वर्तुळात चिंता.
पुणे: पुणे शहरात वैद्यकीय शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या प्रचंड तानाखाली वावरणारे तरुण विद्यार्थी टोकाची पावले उचलत असल्याच्या दोन अत्यंत दुर्दैवी व हादरवून सोडणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. कात्रज परिसरातील एका उच्चभ्रू सोसायाटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून २१ वर्षीय एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, दुसरीकडे नवी पेठेत एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका २८ वर्षीय तरुण विद्यार्थ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एकाच दिवसात घडलेल्या या दोन्ही स्वतंत्र दुर्घटनेमुळे पुणे शैक्षणिक व विद्यार्थी वर्तुळात मोठी शोककळा पसरली असून, युवकांमधील वाढत्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पहिली घटना कात्रज परिसरातील ‘नॅन्सी लेक होम’ या सोसायाटी मध्ये घडली. येथील १० व्या मजल्यावरून पडून २१ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. आदी माया शेखर रेड्डी (वय २१, मूळ रा. तिरूमलंगरी, हैदराबाद, तेलंगणा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कात्रज येथील फ्लॅटमध्ये आपल्या भावासोबत राहत असून वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, सध्या तिची परीक्षा सुरू होती आणि याच परीक्षेच्या प्रचंड मानसिक तणावाखाली ती वावरत होती, अशी माहिती तिचा भाऊ व डॉक्टर असलेला आदी अदीम शेखर रेड्डी याने पोलिसांना दिली. परीक्षेच्या तणावातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तिच्या भावाने कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या एका धक्कादायक घटनेत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची अविरत तयारी करणाऱ्या एका २८ वर्षीय तरुण विद्यार्थ्याने पुण्यातील नवी पेठ परिसरात आत्महत्या केली आहे. प्रथमेश देशमुख असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा परंडा येथील रहिवासी होता. नवी पेठेत एका भाड्याच्या खोलीत राहून तो स्पर्धा परीक्षेचे धडे गिरवत होता. प्राथमिक तपासात त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले असून, या आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचे कृत्य केल्याचा संशय आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत तपासणी केली असता, त्यांना घटनास्थळी एक दोन पानांची अत्यंत महत्त्वाची सुसाइड नोट आढळून आली.
पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी दिलेल्या माहिती नुसार, या सुसाइड नोटमध्ये प्रथमेशने तब्बल १८ ते १९ व्यक्तींकडून पैसे घेतल्याचा स्पष्ट उल्लेख केला असून, त्या सर्व व्यक्तींची नावे आणि आर्थिक व्यवहाराचा तपशील नमूद केला आहे. तसेच यातील काही जणांना काही रक्कम परत केल्याची नोंदही त्यात आढळली आहे. मात्र, प्रथमेशने एवढ्या लोकाकडून कर्ज का घेतले, त्यामागचे नेमके कारण काय होते आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा जास्तीचा दबाव होता का, या सर्व गंभीर बाजूंचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याच्या जवळच्या व्यक्तींची आणि कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. शैक्षणिक व करिअरच्या ताणामुळे सुशिक्षित तरुण वर्गात वाढणारे नैराश्य रोखण्यासाठी सामाजिक व मानसिक पातळीवर व्यापक उपाय योजना करण्याची गरज या घटनांमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
