- Hindi News
- पुणे
- पुण्यात दुचाकी चोरांचे रॅकेट उघड; १४ मोटारसायकली जप्त, दोघे जेरबंद
पुण्यात दुचाकी चोरांचे रॅकेट उघड; १४ मोटारसायकली जप्त, दोघे जेरबंद
पुण्यात विश्रामबाग पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत १४ मोटारसायकली जप्त केल्या. शहर व जिल्ह्यांतील १२ गुन्हे उघडकीस.
पुणे: नवी पेठेतील वाहन चोरीच्या एका गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना विश्रामबाग पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघा सराईतांना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १४ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या असून, याद्वारे पुणे शहर आणि इतर परिसरातील तब्बल १२ वाहनचोरीचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील एक मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, २३ जून २०२६ रोजी नवी पेठेतील चिमणबाग सोसायटी परिसरातून एका नागरिकाची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलिसांना खबऱ्या मार्फत गोपनीय माहिती मिळाली की, नारायण पेठ परिसरात काही संशयित तरुण थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच वैभव सांगुळे (रा. सुतारदरा, कोथरूड) हा मुख्य आरोपी घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला, मात्र पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाची त्याच्या आत्याच्या उपस्थितीत सखोल चौकशी केली असता, त्याने चोरलेल्या गाड्यांपैकी दोन मोटारसायकली कृष्णा शेळके याला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत कृष्णा चंद्रकांत शेळके (वय २६, रा. माळेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) याला अटक केली. या आरोपींच्या चौकशीतून विश्रामबाग पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघडकीस आले असून, याशिवाय समर्थ, हडपसर, काळेवाडी, भारती विद्यापीठ आणि विमानतळ पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. यासह इतर जिल्ह्यांमधील ५ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण १४ मोटारसायकली पैकी १२ वाहनांच्या मालकांची ओळख पटली असून, उर्वरित दोन मोटारसायकलींच्या मूळ मालकांचा शोध घेतला जात आहे. पसार झालेल्या वैभव सांगुळे याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे आणि रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबुब मोकाशी तसेच अंमलदार अमोल भोसले, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे आणि इतर सहकाऱ्यांच्या पथकाने ही महत्त्वाची कामगिरी फत्ते केली आहे. शहरात वाहनचोरी करणाऱ्या समाजकंटकांवर पुणे पोलिसांकडून यापुढेही असाच कठोर कायदेशीर बडगा उगारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
