- Hindi News
- पुणे
- जुन्या वादाचा भडका, तरुणावर गोळीबार; पाच सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
जुन्या वादाचा भडका, तरुणावर गोळीबार; पाच सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
पुण्यातील आंबेगाव येथे जुन्या वादातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या ५ सराईत गुन्हेगारांना अटक. ३ गावठी पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे जप्त.
पुणे: जुन्या वादाच्या कारणातून जिन्यातून घरी जात असलेल्या एका तरुणावर प्राणघातक गोळीबार करून पसार झालेल्या सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आंबेगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच कुख्यात आरोपींना अटक करत त्यांच्या कडून तब्बल ३ गावठी पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे असा घातक शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. या धडक आणि धडाकेबाज कारवाईमुळे आंबेगाव तसेच परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोर्णिमा रामदास माने (वय ४३, रा. हरणाई कॉम्प्लेक्स, आंबेगाव) यांनी या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादी नुसार, गत ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत रामदास माने (वय २१) हे तरुण जिन्यावरून चालत आपल्या घरी जात होते. याच दरम्यान दुचाकी वरून आलेल्या संशयित आरोपींनी पूर्वद्वेषातून व जुन्या वादाच्या राग मनात धरून त्यांच्या दिशेने अचानक दोन गोळ्या झाडल्या आणि अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. या थरारक हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तीव्र भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर गुन्ह्याचा समांतर व तांत्रिक तपास करत असताना पोलिसांना खबऱ्या मार्फत आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी जांभुळवाडी येथील दख्खन हॉटेलच्या रस्त्यालगत थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने संबंधित परिसराला वेढा देत सापळा रचला आणि पाचही जणांना जेरबंद केले. त्यांच्या अंगझडतीत व त्यांच्याकडून ३ गावठी पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी शिवदत्त ऊर्फ सोन्या हरीकाका कोंढरे (वय २३, रा. आंबेगाव), श्रेयश रुपेश काटे (वय २३, रा. धायरी फाटा), सुरज सुभाष डिंबळे (वय २३, रा. कल्याण), अतिष उमेश मोरे (वय २८, रा. आंबेगाव) आणि ऋत्विक ऊर्फ दगडु पांडुरंग बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव) या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे यांच्या सूचनां नुसार पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवाजी पोटोळे व फिरोज शेख यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली. शहरात अवैध शस्त्रास्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पुणे पोलिसां कडून यापुढेही असाच कठोर कायदेशीर बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा प्रशासना कडून देण्यात आला आहे.
