- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- आमदारांच्या वक्तव्यावरून बुलढाण्यात राजकीय संघर्ष; श्वेता महालेंचे कायदेशीर कारवाईचे संकेत
आमदारांच्या वक्तव्यावरून बुलढाण्यात राजकीय संघर्ष; श्वेता महालेंचे कायदेशीर कारवाईचे संकेत
बुलढाण्यात भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यात राजकीय कलह. श्वेता महालेंचा कायदेशीर कारवाईचा इशारा व नार्को टेस्टचे आव्हान.
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक राजकारण आणि वर्चस्वाच्या मुद्यावरून चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील कलह आता विकोपाला गेला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि शक्ती प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकेचे तीव्र आसूड ओढले आहेत. या दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या एका अत्यंत वादग्रस्त आणि वैयक्तिक वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत आमदार श्वेता महाले यांनी कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, ज्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना श्वेता महाले म्हणाल्या की, तुम्ही कितीही मोठे आमदार असलात तरी कोणत्याही महिलेच्या शरीराबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही आणि देशात असा कोणताही कायदा नाही. या प्रकरणा बाबत आपण कायदेशीर सल्ला घेत असून कायदेशीर मार्गानेच योग्य ते पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच "बाप काढणे" आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलणे हे आपल्या संस्कृतीतील संस्कार नसल्याचे सांगत, ज्यांच्यावर तसे संस्कार झाले आहेत त्यांनीच ती भाषा वापरावी, असा कडक शब्दांत पलटवार त्यांनी केला. या वादात केवळ शब्दांचे युद्ध न थांबता त्यांनी थेट नार्को टेस्टचे आव्हान दिले असून, खोट्या केसेस दाखल करणे, महिलांचा गैरवापर करणे, गरिबांच्या मुलांना अडकवणे आणि जमिनी बळकावणे असले प्रकार चिखलीत चालत नाहीत, असे सांगत हिंमत असेल तर नार्को टेस्ट करून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, असे आव्हान दिले.
महायुतीचा धर्म पाळणे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य असताना काही लोकांना दुसऱ्याच्या मतदार संघात जाऊन विनाकारण ढवळाढवळ करण्याची वाईट सवय जडली आहे, असा टोला त्यांनी नाव न घेता संजय गायकवाड यांना लगावला. जनतेने आपल्याला मतदार संघाच्या विकासासाठी निवडून दिले असून विकासाचे मुद्दे सोडून इतर गोष्टींमध्ये लक्ष घालणे चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या. वाढदिवसाच्या खर्चावरून विरोधकांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या आरोपांचे खंडन करताना, आपण एकही पैसा खर्च केला नसून सर्व खर्च मित्रांनीच केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बुलढाणेकर जनता असल्या कसल्याही हुकूमशाहीला किंवा दडपशाहीला भीत नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना ठणकावले. दरम्यान, नुकतीच राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन मंत्र्यांसोबत चर्चा झाली असून, शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वासही आमदार श्वेता महाले यांनी या वेळी व्यक्त केला.
