पुणे गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान शिवाजी रोड बंद

पुण्यात गणेशोत्सवाच्या आगमनामुळे १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान वाहतुकीत मोठे बदल. शिवाजी रोडवरील वाहतूक वळवली, पीएमपीएमएल बसचे मार्ग बदलले.

पुणे: गणेशोत्सवाच्या आगमना निमित्त लाडक्या बाप्पाच्या मूर्तींची खरेदी आणि श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी शहरात होणारी नागरिकांची अलोट गर्दी लक्षात घेता, पुणे वाहतूक पोलिसांनी १२ ते १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शहराच्या विविध भागांत विशेष वाहतूक आराखडा लागू केला आहे. भाविकांना आणि गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या तीन दिवसांत सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल केले जाणार असून, आपत्कालीन सेवा जसे की अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिकांना या निर्बंधांमधून पूर्ण सूट देण्यात आली आहे.

         शहरात डेंगळे पूल ते शिवाजी पूल दरम्यान श्रमिक भवन, अण्णाभाऊ साठे चौक, कसबा पेठ पोलीस चौकी ते जिजामाता चौक, मंडई परिसर, सावरकर पुतळा ते समाधान भेळ सेंटर, सिंहगड रोड तसेच कुंभारवाडा आणि केशवनगर-मुंढवा भागात मूर्ती विक्रीचे स्टॉल असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सुरळीत वाहतुकीसाठी शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा टप्पा गरजे नुसार वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात गाडगीळ पुतळा चौकातून येणाऱ्या वाहन चालकांना संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक आणि शाहीर अमर शेख चौकमार्गे पुढे जाता येईल. तसेच शिवाजीनगर कडून स्वारगेटकडे जाणारी वाहने स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक आणि टिळक चौकमार्गे वळविण्यात आली आहेत. झाशी राणी चौक ते डेंगळे पूलमार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महापालिका भवन, मंगला सिनेमा लेन, प्रीमियर गॅरेज चौक आणि शिवाजी पूलमार्गे पर्यायी मार्ग खुला करण्यात आला आहे.

          सिंहगड रोडवरील वाहतुकीचे नियंत्रण करताना सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या टप्प्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू राहील, परंतु या संपूर्ण पट्ट्यात गाड्या पार्क करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूस तसेच निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, केशवनगर आणि मुंढवा परिसरातही १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत तात्पुरते बदल लागू राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मांजरीकडे जाणारी वाहने गायरान वस्ती रोड, रेणुका माता मंदिर आणि विहान सोसायटी रोडमार्गे जातील, तर मुंढवा व केशवनगर मधील विशिष्ट मार्गांवर जड वाहनांच्या प्रवेशास पूर्ण बंदी असेल.

          फडके हौद चौक ते फुटका बुरुज, अप्पा बळवंत चौक ते मोती चौक आणि मंगला टॉकीज समोरील प्रीमियर गॅरेज लेनमधून कुंभारवेसकडे जाणारी सर्वसाधारण वाहतूक एकेरी ठेवण्यात आली आहे. गणेशमूर्ती खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी न्या. रानडे पथ, वीर संताजी घोरपडे पथ, टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्ता, मंडईतील मिनर्व्हा व आर्यन वाहनतळ तसेच शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक येथे वाहन पार्किंगची अधिकृत व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहतूक बदलांचा प्रभाव सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवरही पडला असून, शिवाजीनगरहून शिवाजी रोडमार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बस आता स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोड आणि टिळक मार्गाने चालवल्या जात आहेत. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे योग्य नियोजन करावे आणि शहर पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप

Latest News

मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप
केंद्र सरकारच्या दबावाखाली 'मेटा' कडून इन्स्टाग्राम खाती व पोस्ट ब्लॉक केल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप. सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावरून वाद पेटला.
देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार की महाराष्ट्रातच? अमृता फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
आमदारांच्या वक्तव्यावरून बुलढाण्यात राजकीय संघर्ष; श्वेता महालेंचे कायदेशीर कारवाईचे संकेत
जरांगेंच्या आंदोलना विरोधात सदावर्ते आक्रमक; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात जाण्याची घोषणा
ढोल-ताशांच्या गजरात पुणे फेस्टिव्हलचा शुभारंभ; अलका चौकात रंगणार ‘मंगलाचरण’

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software