- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मिहान इंडियाकडून लोक कल्याणकारी उपक्रमांसाठी १.३५ कोटींचा सीएसआर निधी
मिहान इंडियाकडून लोक कल्याणकारी उपक्रमांसाठी १.३५ कोटींचा सीएसआर निधी
मिहान इंडिया लिमिटेडकडून नागपुरातील आरोग्य, पर्यावरण आणि शैक्षणिक विकासासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा सीएसआर निधी प्रदान.
नागपूर: नागपूर शहराचा सर्वांगीण विकास, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणीय समृद्धीला अधिक गती देण्यासाठी मिहान इंडिया लिमिटेडने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची (CSR) उत्तम परंपरा राखत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातील 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानी आयोजित विशेष कार्यक्रमात विविध सामाजिक संस्था आणि नागपूर महानगरपालिकेला एकूण १ कोटी ३५ लाख रुपयांच्या सीएसआर निधीचे धनादेश अत्यंत उत्साही वातावरणात प्रदान करण्यात आले. या निधीच्या माध्यमातून शहरातील आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक सुविधांच्या विकासाला मोठे बळ मिळणार आहे.
या निधीच्या माध्यमातून नागपूर आणि परिसरातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना थेट आर्थिक हातभार लावला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या 'जीविका फाऊंडेशन'च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण अभियानासाठी २५ लाख रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला आहे. याशिवाय, नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात प्रभावी सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली राबविण्यासाठी आणि महिला सक्षमी करणाच्या विविध प्रभावी प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रत्येकी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, नागपूर शहराचे हरित क्षेत्र वाढवून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहिमेसाठी १० लाख रुपयांचा विशेष निधी महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला आहे.
केवळ आरोग्य आणि पर्यावरणच नव्हे, तर शिक्षणाच्या प्रसारालाही याद्वारे प्राधान्य देण्यात आले आहे. 'वूमन्स एज्युकेशन सोसायटी, नागपूर' अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन इमारत आणि सभागृहाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्यासाठी ३० लाख रुपयांचा सीएसआर निधी देण्यात आला आहे. या सर्व कल्याणकारी उपक्रमांमुळे नागपूरकरांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्या सोबतच शहराच्या विकासात्मक पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण धनादेश वितरण सोहळ्यास नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी व विविध मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
