मुंबईच्या कुर्ल्यात क्रेन कोसळून मोठी दुर्घटना; १० जण जखमी

मुंबईतील कुर्ल्यात MMRDA च्या कामा दरम्यान अजस्त्र क्रेन घरावर आणि रेल्वे ट्रॅकवर कोसळली. ८ ते १० जण जखमी, वाहनांचे मोठे नुकसान.

मुंबई: मुंबईतील कुर्ल्यातून एक अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणारी दुर्घटना समोर आली आहे. कुर्ला परिसरातील कुरैशी नगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास मेट्रोपॉलिटन रीजियन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) च्या एका प्रकल्पाचे काम सुरू असताना, उंचावर कार्यरत असलेली एक अजस्त्र क्रेन अचानक कोसळली. क्रेनच्या साह्याने एक जेसीबी मशीन दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला. तोल गेल्यामुळे क्रेन आणि जेसीबी थेट खाली एका रहिवासी घरांवर आणि रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर आदळले. या दुर्घटनेत ८ ते १० नागरिक गंभीर जखमी झाले असून, मध्यरात्री झालेल्या या अचानक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच गदारोळ व भीतीचे वातावरण पसरले होते.

        मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान एमएमआरडीएच्या वतीने विविध विकास कामांचे नियोजन सुरू आहे. या दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास एका क्रेनच्या मदतीने जेसीबी मशीन हवेत उचलून अन्यत्र शिफ्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम सुरू असताना प्रशासनाकडून परिसर रिकामा करण्यात आला होता, मात्र काही स्थानिक नागरिक सुरक्षित अंतरावर थांबून या संपूर्ण प्रक्रियेचा मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट करत होते. नेमक्या याच वेळेस क्रेनचा अचानक तोल बिघडला आणि ती यंत्र सामग्रीसह थेट खाली कोसळली. क्रेनचा मुख्य भाग परिसरातील दोन घरांवर आदळला आणि त्यानंतर थेट रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) वायरपर्यंत जाऊन पोहोचला. या अपघातात घरांचे मोठे नुकसान झाले असून रस्त Uवर उभे असलेली एक कार आणि एक रिक्षा देखील क्रेनच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्याने चक्काचूर झाली आहे.

        या दुर्घटनेची तीव्रता अत्यंत मोठी असली, तरी सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, क्रेनच्या तडाख्यामुळे जवळपास ८ ते १० जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक अवघ्या काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. प्रशासना कडून तातडीने बचावकार्य सुरू करत क्रेनचा ढिगारा बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून संबंधित परिसर तात्पुरता बंद करण्यात आला.

      दरम्यान, क्रेनचा काही भाग कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यानच्या सिंगल रेल्वे ट्रॅकवर आणि ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे रेल्वे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, या मार्गावरून प्रामुख्याने केवळ मालगाड्यांचीच वाहतूक चालत असल्यामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनसेवेवर या दुर्घटनेचा कोणताही परिणाम झालेला नाही, ही प्रवाशांसाठी दिलासा दायक बाब ठरली आहे. मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेमुळे एमएमआरडीएच्या प्रकल्पांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रात्रीच्या वेळी चालवल्या जाणाऱ्या अशा कामांबाबत अधिक काळजी घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विनापरवाना डीजे गाड्यांवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ३६ हजारांचा दंड

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software