- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महाविकास आघाडीत जुंपली; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
महाविकास आघाडीत जुंपली; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या 'मनुस्मृतीवादी' विधानावर खासदार सुप्रिया सुळे यांचा पलटवार. महाराष्ट्र आणि दिल्लीतील काँग्रेस नेत्यांमधील संवादावर उठवले प्रश्न.
मुंबई: राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकां सोबतच आता महाविकास आघाडीतील (मविआ) मित्र पक्षांमध्येही शाब्दिक फैरी झाडल्या जात असल्याचे चित्र समोर येत आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि राजकीय भूमिकेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत पलटवार केला असून, राज्यातील काँग्रेस नेते जाणीव पूर्वक राष्ट्रवादीला चुकीच्या राजकीय चौकटीत बसवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनुस्मृतीवादी' विचारांच्या लोकांसोबत जाण्यापासून सावध राहण्याचा मोलाचा सल्ला दिला होता. या विधानाचा समाचार घेताना माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्या म्हणाल्या की, राज्यातील काँग्रेसचे काही नेते नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चुकीच्या राजकीय बॉक्समध्ये किंवा चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करत असतात. केंद्रातील काँग्रेस नेत्यांशी आमचा नियमित आणि सलोख्याचा संवाद असतो, परंतु राज्य आणि दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाच्या संवादात व भूमिकेत काही प्रमाणात अंतर असल्याचे यावरून स्पष्ट होते, असे सुळे यांनी नमूद केले.
या दरम्यान पक्षाच्या स्थापनेचा आणि संघर्षाचा मुद्दा उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगात प्रतिस्पर्धी गटाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात यश मिळाले असले, तरी सर्वोच्च न्यायालयातील खरी कायदेशीर लढाई अजूनही सुरू आहे. स्वतःच्या रक्ताचे पाणी करून पक्ष उभा करणाऱ्या शरद पवारांकडून राजकीय खेळी करून पक्ष काढून दुसऱ्याला देणे हा सरळसरळ अन्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
या चर्चे दरम्यान बीड मधील विलास घुले प्रकरणाचा संदर्भ देत सुप्रिया सुळे यांनी बजरंग सोनावणे यांच्या कुटुंबावर होत असलेल्या राजकीय आरोपांवर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. राजकीय संघर्ष हा राजकीय पातळीवरच लढावा, तो कधीही घरापर्यंत किंवा कुटुंबापर्यंत नेऊ नये, तसेच विरोधकांकडून खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल केले गेल्यास ते अजिबात सहन केले जाणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला. या कठीण काळात खासदार बजरंग सोनावणे यांच्या पाठीशी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याचबरोबर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवरही सुळे यांनी तीव्र शब्दांत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकशाही मार्गाने आपले कार्यक्रम व संवाद साधत असताना राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून एवढ्या जाचक अटी आणि निर्बंध का घातले जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, यापूर्वी २०१४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याबाबत झालेल्या चर्चेवरही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले होते. एकूणच, मविआतील नेत्यांकडून सुरू असलेली ही वक्तव्यांची देवाणघेवाण आणि परस्परविरोधी विधाने आगामी काळात राजकीय समीकरणांवर काय प्रभाव पाडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
