‘महा वॉकेथॉन’ला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ लाखांहून अधिक नागरिक सहभागी

महाराष्ट्रात २१ ऑगस्ट जलसंधारण दिनानिमित्त 'महा वॉकेथॉन २०२६' पार पडली. ३६ जिल्ह्यांत ३ लाखांहून अधिक नागरिक, सेलिब्रेटी अन् मान्यवरांचा सहभाग.

मुंबई: माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय आणि दूरदर्शी कार्याचा आदर्श समोर ठेवून त्यांची जयंती २१ ऑगस्ट हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महत्त्वपूर्ण औचित्य साधून मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६' या राज्यस्तरीय उपक्रमाला सेलिब्रेटी, तरुणाई आणि सामान्य नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. माती आणि पाण्याचे जतन करण्याचे महत्त्व जनमानसात रुजवत याद्वारे एका जलसंपन्न महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ठोस पाऊल टाकण्यात आले आहे, अशी भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

      मुंबईतील वरळी येथील सागर पॉईंटजवळ आणि आरे दुग्ध वसाहतीजवळ सागरी किनारा रस्त्यालगत असलेल्या प्रोमोनेट परिसरातून या राज्यस्तरीय महा वॉकेथॉनचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात करताना माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तुळशी रोपाला जल अर्पण करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने जलपूजन करण्यात आले. उपस्थितांना माती व जलसंधारणाच्या संवर्धनाची शपथ देण्यात आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनची सुरुवात झाली. या राज्यस्तरीय मोहिमेत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव श्रीकांत पुलकुंडवार, तसेच लोकप्रिय गायक संजू राठोड, अभिनेते पुष्कर श्रोत्री, प्रसिद्ध क्रिकेटपटू इरफान पठाण, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संगीतकार संजीव-श्रवण यांसारखे चित्रपट, क्रीडा व कला क्षेत्रातील दिग्गज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

     वरळी येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले की, केवळ मंत्रालयातील वातानुकूलित कक्षात किंवा सभागृहात बैठका घेण्याऐवजी थेट लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा शासनाचा मानस होता. 'माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा' या संदेशाखाली राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आयोजित केलेल्या या महा वॉकेथॉनमध्ये तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. माती आणि पाणी हे राज्याच्या भविष्याशी जोडलेले अत्यंत महत्त्वाचे विषय असून, त्यांच्या संवर्धनासाठी केवळ शासकीय यंत्रणा नव्हे तर लोकसहभाग वाढणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः राज्यातील तरुण पिढीने या चळवळीत उत्साहाने सहभाग नोंदवून जलसंधारणाला बळ दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या विचारांना व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले होते, त्याची आठवण यावेळी ताजी करण्यात आली. विशेष म्हणजे, मंत्री संजय राठोड यांच्यासह सर्व प्रमुख मान्यवरांनी तब्बल तीन किलोमीटरचे संपूर्ण अंतर वॉकेथॉन मधील सहभागींसोबत स्वतः पायी चालून पार केले आणि नागरिकांचा प्रचंड उत्साह वाढवला.

      या वेळी आपले विचार व्यक्त करताना विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले की, पाणी ही जात, पात किंवा धर्माच्या पलीकडची प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. पाणी वाचवणे आणि माती जिरवणे ही संकल्पना तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा महा वॉकेथॉन उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत मिळालेला प्रतिसाद पाहता भविष्यात यातून एक भक्कम लोकचळवळ उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पावसाचे पाणी आणि त्यासोबत वाहून जाणारी सुपीक माती रोखण्यासाठी जल व मृदसंधारणाच्या कामात जनसहभाग वाढवण्याचे आवाहन केले. या व्यापक मोहिमेमुळे राज्यातील ग्रामीण व शहरी भागांत जलसुरक्षेबाबत मोठी जागृती निर्माण झाली असून, भावी पिढ्यांसाठी शाश्वत पाणी व मातीची व्यवस्था उभी राहण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विनापरवाना डीजे गाड्यांवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ३६ हजारांचा दंड

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software