कोंढव्यात गांजा खरेदी-विक्रीवर पोलिसांचा दणका; १५५ जणांवर कारवाई

पुण्यातील कोंढव्यात गांजा खरेदी-विक्रीवर पोलिसांचा मोठा दणका. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने १५५ जणांना ताब्यात घेतले असून २१ तस्करांना अटक केली.

पुणे: पुण्यातील अत्यंत गजबजलेला आणि संवेदनक्षम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंढवा परिसरात अंमली पदार्थांची बेकायदेशीर खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा अत्यंत खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा हा परिसर आता जणू काही अंमली पदार्थांचे मोठे 'हब' बनत चालल्याचे पोलिसांच्या अलीकडील कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्त व विशेष मोहीम राबवत गेल्या दोन दिवसांत गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या तब्बल १५५ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरात ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले असून, पहाटेच्या सुमारास चालणाऱ्या या अवैध धंद्यांचा पर्दाफाश झाला आहे.

      पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, कोंढवा परिसरातील विविध भागांत तस्कर मोबाइल मेसेजच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ग्राहकांशी संपर्क साधत असतात. विशेषतः पहाटे ५ ते ७ या अवघ्या दोन तासांच्या कालावधीत ही काळी तस्करी मोठ्या प्रमाणावर चालते. शहरातील विविध भागांतून गांजा खरेदी करण्यासाठी तरुण व नागरिक कोंढव्यात येतात आणि काही मिनिटांतच पोबारा करतात. या संशयास्पद हालचालींची कुणकुण लागल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने गेल्या दोन ते तीन दिवस या परिसरात कसून रेकी केली. २० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास काकडे वस्तीतील शिवनेरी गल्लीत पोलिसांनी सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना ३ किलो गांजासह जेरबंद केले. त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने या दोन्ही तस्करांना सोबत घेऊन साध्या वेषात गस्त घातली. गांजा खरेदीसाठी येणारे ग्राहक नेहमीप्रमाणे दुचाकी किंवा वाहने बाजूला उभी करून तस्करांकडे आले असता, दबा धरून बसलेल्या पोलिसांमार्फत त्यांना रंगेहात पकडण्यात आले. अवघ्या दोन तासांत अशा तब्बल ४३ जणांना टास्क फोर्सने ताब्यात घेतले.

      केवळ एका दिवसा पुरती ही मोहीम मर्यादित नसून, कोंढवा पोलिसांनी मागील दोन दिवसांत वेगवेगळ्या भागांत सखोल शोध मोहीम राबवत ६१ आणि ५१ अशा तब्बल ११२ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यापूर्वीच शिवनेरीनगर, अश्रफनगर व परिसरातील अनेक सराईत अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या टोळ्यांवर 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत एकूण ८ गुन्हे दाखल करून पोलिसांनी ५ लाख ६ हजार ७८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि २१ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या सातत्य पूर्ण आणि धडक मोहिमांमुळे कोंढव्यातील ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडले आहे.

      या गंभीर समस्येवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाई न करता जन जागृतीचा मार्गही अवलंबला आहे. १७ ऑगस्ट रोजी ६१ आणि २० ऑगस्ट रोजी ५१ जणांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांचे विशेष समुपदेशन (Counseling) करण्यात आले. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तरुणांचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य आणि कायदेशीर बाबींची माहिती देऊन पोलिसांनी त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगितले की, तस्कर रोज आपले विक्रीचे ठिकाण बदलत असतात, मात्र पोलीसही त्यांच्यावर सतत व बारीक लक्ष ठेवून आहेत. परिसरातील अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यासाठी गस्त अधिक तीव्र करण्यात आली असून यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विनापरवाना डीजे गाड्यांवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ३६ हजारांचा दंड

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software