- Hindi News
- सातारा
- विनापरवाना डीजे गाड्यांवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ३६ हजारांचा दंड
विनापरवाना डीजे गाड्यांवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ३६ हजारांचा दंड
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलिसांची बेकायदेशीर डीजे गाड्यांवर मोठी कारवाई. फलटण आरटीओकडून ३६ हजार रुपयांचा दंड वसूल.
दहिवडी: आगामी गणेशोत्सव, गोकुळाष्टमी आणि इतर धार्मिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात पोलिसांनी नियमबाह्य व बेकायदेशीर प्रकारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विना परवाना, उच्च आवाजात आणि वाहनांमध्ये अनधिकृत फेरबदल (मॉडिफिकेशन) करून डी.जे. (DJ) साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्यांवर दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे. पिंगळी बुद्रुक आणि राणंद येथे विनापरवाना डी.जे. चालवणाऱ्या दोन वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली असून, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) फलटण यांच्या माध्यमातून दोन्ही वाहन धारकांना मिळून एकूण ३६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पिंगळी बुद्रुक परिसरात मोठा आवाज करत डी.जे. साऊंड सिस्टीम वाजवली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, प्रशांत विठ्ठल लंगरे (रा. सिद्धेश्वर कुरोली) यांच्या मालकीच्या एमएच-०४ जीसी-०३८४ क्रमांकाच्या वाहनात अनधिकृतपणे फेरबदल करून डी.जे. यंत्रणा बसवल्याचे आढळून आले. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राणंद परिसरात पुन्हा अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. यामध्ये सागर संजय गायकवाड (रा. कारुंडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्या एमएच-११ ईटी ६६५८ क्रमांकाच्या वाहनामध्येही बेकायदेशीर मॉडिफिकेशन करून डी.जे. सिस्टम चालवली जात असल्याचे निदर्शनास आले.
दहिवडी पोलिसांनी दोन्ही डी.जे. गाड्या तातडीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केल्या आणि पुढील दंडात्मक कारवाई साठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) फलटण यांच्याकडे अधिकृत प्रस्ताव पाठवला. आरटीओ अधिकाऱ्यांनी दोन्ही वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी वाहन धारकांवर ३६ हजार रुपयांचा दंड आकारला. दंडाची ही रक्कम भरल्या नंतरच सदर वाहने सोडण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि दहिवडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई पार पडली. यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रहार खाडे, चंद्रकांत पाटील, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस शिपाई नरबट, कुदळे, धुमाळ व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्सव, दुर्गादेवी उत्सव तसेच इतर सार्वजनिक सण-उत्सवांच्या काळात कोणत्याही मंडळ किंवा नागरिकाने बेकायदेशीर डी.जे. किंवा ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करू नये, असे सक्त आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. वाहनांमध्ये अनधिकृत बदल करणाऱ्यांवर आणि ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढील काळातही अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला असून, सार्वजनिक शांतता व सुरक्षेसाठी नागरिकांनी डी.जे. ऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर करून सहकार्य करावे, असे सुचवले आहे.
