पुण्यात भिशीच्या नावाखाली २० कोटींचा महाघोटाळा; शिरूर मध्ये तिघांना अटक

पुण्यातील शिरूर येथे 'कारेश्वर भिशी मंडळा'द्वारे २० कोटी ३४ लाखांचा घोटाळा उघड. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तिघांना केली अटक.

पुणे: गुंतवणुकीवर अवघ्या काही कालावधीतच रक्कम दामदुप्पट करून देण्याचे मोठे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा एक अत्यंत खळबळ जनक प्रकार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात उघडकीस आला आहे. कारेगाव परिसरातील कथित ‘कारेश्वर भिशी मंडळा’च्या माध्यमातून तब्बल २० कोटी ३४ लाखांहून अधिक रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तीन महिलांसह एकूण पाच जणांविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी धडक कारवाई करत त्यातील तिघा मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

      सुलभा शरद नवले (वय ५०), नितीन शरद नवले (वय ३२), सुहास शरद नवले (वय ३०), अश्विनी नितीन नवले आणि प्रतीक्षा सुहास नवले (सर्व रा. कारेगाव, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुलभा नवले, नितीन नवले आणि सुहास नवले या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने त्यांना सोमवार, २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

       पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, फिर्यादी बारकू चंदर सोनवणे यांनी याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी २०२० मध्ये ‘कारेश्वर भिशी मंडळ’ सुरू केल्याचे सांगत हा गोरखधंदा चालवला होता. विशेष म्हणजे, या भिशी मंडळाची कोणतीही कायदेशीर नोंदणी कोणत्याही सरकारी कार्यालयात, बँकेत किंवा धर्मादाय आयुक्तांकडे केलेली नव्हती. असे असतानाही हे मंडळ पूर्णपणे कायदेशीर व नोंदणीकृत असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यात आली. नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रकमा गुंतवून घेतल्या गेल्या आणि त्यावर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले.

      हा आर्थिक गैरव्यवहाराचा खेळ डिसेंबर २०२५ पर्यंत अविरत सुरू होता. त्यानंतर जेव्हा गुंतवणूकदारांनी आपली मूळ रक्कम आणि ठरलेला परतावा परत मागण्याची मागणी सुरू केली, तेव्हा आरोपींनी विविध कारणे पुढे करत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर पैसे मागणाऱ्या काही गुंतवणूकदारांना दमदाटी आणि अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली.

      पोलिसांनी याप्रकरणी संबंधितांचे जबाब नोंदवून आणि प्राथमिक आर्थिक नोंदींची कसून पडताळणी केल्यानंतर फसवणूक व अपहाराचा गुन्हा नोंदवला. तपासा दरम्यान समोर आलेल्या आकडेवारीनुसार, फिर्यादी सोनवणे यांच्यासह तब्बल ३९ जणांनी या भिशीमध्ये एकूण २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये गुंतवले होते. ही प्रचंड रक्कम रोख तसेच ऑनलाइन माध्यमातून विविध वैयक्तिक बँक खात्यांवर जमा करून ती हडप करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम करत असून, या जाळ्यात आणखी काही जण अडकले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विनापरवाना डीजे गाड्यांवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ३६ हजारांचा दंड

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software